‘व्हॉट्सअॅप’वरून जुळताहेत रेशीमगाठी!

By Admin | Updated: April 23, 2017 02:14 IST2017-04-23T02:14:07+5:302017-04-23T02:14:07+5:30

लग्न जुळविण्यासाठी पूर्वापार चालत आलेली साधने आता मागे पडत चालली असून, व्हॉट््सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. ‘व्हॉट्सअॅप’

Silhouette matching 'Whatsapp'! | ‘व्हॉट्सअॅप’वरून जुळताहेत रेशीमगाठी!

‘व्हॉट्सअॅप’वरून जुळताहेत रेशीमगाठी!

- भाग्यश्री मुळे, नाशिक

लग्न जुळविण्यासाठी पूर्वापार चालत आलेली साधने आता मागे पडत चालली असून, व्हॉट््सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. व्हॉट््सअ‍ॅप ग्रुपद्वारे लग्न जुळविण्याचा फंडा सध्या आघाडीवर असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे लग्न जमविणे सोपे झाल्याचा सूर विवाहेच्छुकांकडून व्यक्त होत आहे.
पूर्वी ओळखीच्या नातेवाइकांकडे शब्द टाकला की इच्छुक वधू-वरांची स्थळे समजायची. पत्रिका जुळली की पाहण्याचा कार्यक्रम, पसंती झाली की बैठक आणि साखरपुडा, लग्नाची निश्चिती या गोष्टी लगोलग होत असत. काळ बदलला, विवाह जुळवणाऱ्या व्यावसायिक संस्थांची चलती आली. तेही मागे पडून फेसबुक, व्हॉट््सअ‍ॅपने त्याची जागा घेतली. सध्या लग्न जुळविण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित व्हॉट््सअ‍ॅप ग्रुप कार्यरत आहेत. त्यात प्रत्येक जातीनुसार वेगवेगळे व्हॉट््सअ‍ॅप ग्रुप चालविले जात आहेत. याशिवाय हुंडा घेणारे, न घेणारे, आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न करण्यास तयार असणाऱ्यांचे व्हॉट््सअ‍ॅप ग्रुप रेशीमगाठी जुळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. हे व्हॉट््सअ‍ॅप ग्रुप मोफत सभासदत्व व माहिती देत आहेत. इच्छुक वधू-वरांचे फोटो, बायोडाटा, कौटुंबिक माहिती, छंद-आवडीनिवडी, अपेक्षा या साऱ्यांची माहिती संक्षिप्त आणि थेटपणे मिळत असल्याने वधू-वर व त्यांच्या पालकांना निर्णय घेणे सोपे जात आहे.

जात-वयानुसारही वेगवेगळे ग्रुप
ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्यांना सुरुवातीला नियमावली सूचना स्वरूपात दिली जात असून, घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. सध्या देशभर जातीनुसार, समाजानुसार, वयानुसार, ३५ प्लस, ४० प्लस, एमपीयूपी (मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश), महाराष्ट्र प्लस एमपीयूपी असे असंख्य ग्रुप कार्यरत आहेत.
‘शुभविवाह’, ‘शुभबंधन’, ‘रेशीमगाठी’, ‘खान्देशविवाह’ अशा विविध नावांनी हे ग्रुप कार्यरत आहेत. ग्रुपवर दररोज स्थळांचे विविध पर्याय, सविस्तर माहिती, फोटो, अपेक्षा या साऱ्या गोष्टी येत असतात, पण त्याचबरोबर ग्रुपच्या माध्यमातून लग्न जुळल्यास त्याची बातमी, साखरपुड्याचा फोटो अशा गोष्टीही शेअर केल्या जात आहे.

हजारो प्रकारचे
व्हॉट््सअ‍ॅप ग्रुप कार्यरत
विविध कारणांमुळे विवाह जमणे ही गोष्ट दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. पण जसजसे वय वाढते, बरेवाईट अनुभव येऊ लागतात तसतशी अपेक्षांची यादी कमी करत आणि दोन पावले मागे येत वधू-वर मंडळी तडजोड करू लागतात. त्यामुळेच व्हॉट््सअ‍ॅप ग्रुपमध्ये निरनिराळे प्रकार पाहायला मिळत आहे. जातीनुसार, वयोगटानुसार, आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरदेशीय लग्न करू इच्छिणाऱ्यांचे, पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्यांचे, स्वत:च्या शहराबरोबरच दूरवरच्या शहरातील स्थळे चालतील अशी स्थळे सांगणारे ग्रुप कार्यरत झाले आहेत. हे ग्रुप विवाहमंडळ, वधू-वर पालक, समाजसेवक यांच्याकडून चालविले जात आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. विवाहेच्छुक मुलामुलींनी, त्यांच्या पालकांनी ग्रुप अ‍ॅडमिनशी संपर्क साधताच त्यांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करून घेतले जात असून, स्थळांची माहिती मिळणे तत्काळ सुरू होत आहे.

पूर्वी लग्न जुळविणे ही वेळखाऊ आणि पैसेखाऊ प्रक्रिया होती. आता व्हॉट््सअ‍ॅपच्या माध्यमातून या दोन्ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. मागील वर्षापासून आम्ही हे ग्रुप स्थापन केले असून, आजवर बरेचशी लग्ने जमलीही आहेत. विवाह मंडळांकडून सुरू असलेली लूट थांबविण्यातही आम्हाला यश येत आहे.
- माधव देशमुख,
ग्रुप अ‍ॅडमिन

महाराष्ट्रातील २५४ जिल्ह्यांत प्रत्येक जिल्ह्याचा एक ग्रुप याप्रमाणे विवाहेच्छुकांची माहिती देणारे व्हॉट््सअ‍ॅप ग्रुप स्थापन केले आहेत. गरीब मुलामुलींना, त्यांच्या पालकांना त्याचा फायदा होत आहे. आजवर या माध्यमातून अनेक लग्ने जमलीही आहेत. मोफत स्थळांची माहिती मिळत असल्याने त्याला सर्व समाजातून चांगला फायदा होत आहे.
- प्रवीण जेठेवार,
ग्रुप अ‍ॅडमिन

Web Title: Silhouette matching 'Whatsapp'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.