व्हॉटस् अॅप वर जुळल्या रेशीमगाठी
By Admin | Updated: July 29, 2016 19:15 IST2016-07-29T19:15:30+5:302016-07-29T19:15:30+5:30
सोशल मीडिया तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. याचा अचूक वापर परळीतील अमित बियाणी यांनी केला.

व्हॉटस् अॅप वर जुळल्या रेशीमगाठी
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २९ - सोशल मीडिया तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. याचा अचूक वापर परळीतील अमित बियाणी यांनी केला. माहेश्वरी समाजातील युवकांसाठी त्यांनी व्हॉटस् अॅप ग्रुप बनवून तब्बल १५१ युवक-युवतींना ऋणानुबंधात बांधण्याचे पवित्र कार्य केले.
आजच्या स्थितीला विवाह स्थळ पाहण्यासाठी अनेक वधू-वर सूचक केंद्र, विवाह मंडळे व आॅनलाईन पद्धतीने वधू-वरांचे परिचय करुन देणाऱ्या असंख्य वेबसाईट कार्यरत आहेत. वेबसाईटवरुन संपर्क करुन विवाहाची बातचित पुढे सरकते व लग्न जुळते. मात्र अनेकवेळा परराज्यातील किंवा जिल्ह्यातील व्यक्तीशी विवाह झाल्यानंतर धोकेबाजीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे मुलींचे आई-वडील हल्ली सावध झाले आहेत. असे प्रकार होऊ नयेत.
तसेच समाजातील मुलामुलींचे विवाह जुळून यावेत, यासाठी परळीतील अमित बियाणी यांनी व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला. ह्यमाहेश्वरी परिचय मित्रह्ण असे त्या ग्रुपला नाव दिले. एका व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये २५६ व्यक्ती सहभागी होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी याच नावाखाली तीन ग्रुप बनवून त्यामध्ये ७२५ सभासद बनविले. हा ग्रुप चालविण्यासाठी गोपाल ओमप्रकाश लाहोटी, सोनल गोपाल लाहोटी यांचे सहकार्य त्यांना मिळत आहे. ७२५ सभासदांमध्ये २२ जिल्ह्यांचे माहेश्वरी सभा, माहेश्वरी महिला मंडळाचे पदाधिकारी तसेच अखिल भारतीय युवा संघटनेचे कोषाध्यक्ष दत्तप्रसाद तोतला, प्रदेश विवाह समितीचे अध्यक्ष कांतीलाल राठी यांच्यासह राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा येथीलही समाजबांधवांचा सहभाग आहे.
व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून युवक-युवतींचा बायोडाटा अपलोड करण्यात येतो. समाज के लिए समाज के साथ या ब्रीद वाक्याप्रमाणे अमित बियाणी यांचे काम अविरतपणे सुरू आहे. त्याला युवक-युवतींचा प्रतिसाद लाभत आहे. माहेश्वरी परिचय मित्र या व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून विवाह जुळविले जात आहेत. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आतापर्यंत या माध्यमातून दीडशे जोडप्यांचे विवाह जुळवून आणले आहेत. माहेश्वरी समाजबांधवांचा माहेश्वरी परिचय मित्र या ग्रुपवरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत असून, सभासद संख्याही वाढली आहे. त्यामुळेच महाराष्टसह राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू यासह अमेरिकेसारख्या देशातूनही समाज बांधव जोडले गेले आहेत.