आयुष्याच्या संध्याकाळचे मूक आक्रंदन
By Admin | Updated: October 7, 2014 01:14 IST2014-10-07T01:14:33+5:302014-10-07T01:14:33+5:30
वेदनेशी मैत्री करून आयुष्याची सायंकाळ घालविण्याचे त्यांनी प्रयत्न केले. मात्र, वेदनाच त्या. कशा स्वस्थ बसणार? वेदनांची तीव्रता वाढतच राहिली, सोबतीला आली जीवघेणी अस्वस्थता. त्यामुळे एका दाम्पत्याने

आयुष्याच्या संध्याकाळचे मूक आक्रंदन
मोहरील दाम्पत्याच्या आत्महत्येने निर्माण केले अनेक प्रश्न
नरेश डोंगरे -नागपूर
वेदनेशी मैत्री करून आयुष्याची सायंकाळ घालविण्याचे त्यांनी प्रयत्न केले. मात्र, वेदनाच त्या. कशा स्वस्थ बसणार? वेदनांची तीव्रता वाढतच राहिली, सोबतीला आली जीवघेणी अस्वस्थता. त्यामुळे एका दाम्पत्याने जीवघेण्या वेदनेचा निकाल आपला जीव देऊन लावला. स्वाबलंबीनगरातील दीपक भीमराव मोहरील (वय ६८) आणि त्यांच्या पत्नी वासंती (वय ६१) या समृद्ध दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर पुढे आलेली हृदयद्रावक कहाणी सुन्न करून सोडणारी आहे.
दीपक मोहरील हे सनफ्लॅग कंपनीत उच्चपदस्थ होते. वासंती यांचे माहेरही गर्भश्रीमंत. त्यांना श्रीराम नावाचा मुलगा. तो सध्या अमेरिकेत हार्डवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. या समृद्ध कुटुंबाला कशाचीच कमतरता नव्हती. सुखाची सारीच साधने त्यांच्याजवळ होती. निवृत्तीनंतर मोहरील दाम्पत्याने स्वावलंबीनगरातील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये सदनिका घेतली. एक मोलकरीण, सायंकाळनंतर काळजीवाहक म्हणून सोबत असलेली ‘चुटकी’ अन् कुठे जाण्या-येण्यासाठी आपल्या कारवर वाहनचालक म्हणून प्रवीण बडवाईकलाही ठेवून घेतले होते. आयुष्याच्या उत्तरार्धाचा प्रवास सुखासमाधानाने सुरू होता. मे २०१४ मध्ये मोहरील दाम्पत्य केदारनाथ यात्रेला निघाले. रस्त्यातच दीपक मोहरील यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाले. ते कोमात गेले. डेहराडूनच्या हिमालयीन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्रदीर्घ उपचार झाले. अडीच-तीन महिन्याच्या उपचारानंतर ते नागपुरात परतले. मात्र, आता ते पुरते परावलंबी झाले होते. अर्धांगवायूमुळे दीपक मोहरील यांची अवस्था फारच वाईट झाली होती. निवृत्तीपर्यंत वाघासारखा वावरणारा पती आता एकदम हताश, हतबल झाल्याचे पाहून वासंती यांच्या काळजाचे पाणी होत होते. त्यांना आपले दु:ख व्यक्तही करता येत नव्हते.
पतीची ही अवस्था असताना वासंती यांच्यावरही दु:खाने कर्करोगाच्या रूपाने घाव घातला. तरीसुद्धा स्वत:च्या वेदना लपवत पतीचा सांभाळ करण्यासाठी वासंती यांची तगमग सुरू होती. बहुतांश बाहेरची कामे करण्यासाठी त्या स्वत:च धावपळ करीत होत्या. दिवसभर ठीक होते. कामासाठी ठेवलेली मंडळी घरून निघून गेली की मोहरील दाम्पत्याचे मूक आक्रंदन सुरू व्हायचे. एकुलता एक मुलगा साता समुद्रापल्याड, बहीण (वासंती यांची) पुण्याला, तर सासरची (दीपक मोहरील यांचे नातेवाईक) मंडळी अमरावती येथे वास्तव्याला. व्याकुळ सायंकाळी या दोघांना धीर देणारा, त्यांच्या पाठीवर ममतेचा हात फिरवणारा जवळचा कुणीच नसायचा.
साहेब देव माणूस होते
तीव्रता जाणवत नसली तरी सहनिवासी असलेल्यांना मोहरील दाम्पत्याच्या वेदनांची कल्पना होती. सुखांची सारी साधने असतानाही मोहरील दाम्पत्याला सुख उपभोगता येत नसल्याची जाणीव कारचालक प्रवीणला झाली होती. म्हणून प्रवीण रात्री-बेरात्री हाकेला ओ देत होता. साहेब देव माणूस होते. मॅडमही सहृदयी होत्या, असे तो सांगतो. वृद्ध आणि असहाय मोहरील दाम्पत्याच्या जवळ ‘त्या’ क्षणी ‘त्यांचा’ कुणी ‘आपला’ सोबतीला असता तर कदाचित् असे झाले नसते. शेजाऱ्यांची ही प्रतिक्रिया अवघ्या समाजाला अंतर्मुख करणारी ठरावी!