‘पीएमपी’चालकांना सिग्नलचे वावडे
By Admin | Updated: August 2, 2016 01:49 IST2016-08-02T01:49:43+5:302016-08-02T01:49:43+5:30
शहरामध्ये वाहतूक नियमांचे तीनतेरा वाजले असताना पीएमपीच्या बस सिग्नलचे उल्लंघन करून यामध्ये भर घालत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

‘पीएमपी’चालकांना सिग्नलचे वावडे
निगडी : शहरामध्ये वाहतूक नियमांचे तीनतेरा वाजले असताना पीएमपीच्या बस सिग्नलचे उल्लंघन करून यामध्ये भर घालत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
सिग्नलवरील वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवणे अनिवार्य असते. जेणेकरून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे शक्य होते. शहरातील एकाही सिग्नलवर या नियमाचे तंतोतंत पालन होत नाही. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून तर नेहमीच वाहतूक नियमांची ऐशीतैशी केली जाते. मात्र आता पीएमपीच्या बस देखील सिग्नल तोडण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले.
लोकमत प्रतिनिधीने भक्ती - शक्ती चौकात पाहणी केली. तेव्हा असे दिसले की, आगारातून प्रवासी घेऊन निघणाऱ्या जवळपास सर्वच बस सिग्नल न पाळता निगडी गावठाण बसथांब्याच्या दिशेने भरधाव निघतात. त्यामुळे अनेक पादचारी नागरिक रस्ता ओलांडताना बिचकतात. या चौकातील अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच हा चौक गजबजलेला असतो. पीएमपी वाहनांकडून अशा प्रकारे सिग्नलचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. पवळे उड्डाणपुलाखालील चौक, खंडोबा माळ, मोरवाडी चौक, कासारवाडी या चौकांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांकडूनही या बसगाड्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. शासकीय वाहनेच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करीत असतात. त्यामुळे दुचाकी आणि इतर मोठी वाहनेही त्यांच्यापाठोपाठ सिग्नल तोडत असतात. विशेषत: रात्रीच्या वेळी फेऱ्या संपवण्याच्या घाईने बसचालक वेगात बस चालवतात. सिग्नलही पाळले जात नाहीत. यामुळे इतर वाहनचालक बिचकतात. फेऱ्या कोण आधी संपवतो, यावरून या बसचालकांमध्ये स्पर्धा लागते. मात्र यामुळे प्रवासी आणि इतर वाहनांना धोका निर्माण होऊ शकतो. लाल दिवा लागला असतानाही रिक्षाचालक पाठीमागून जोरजोरात हॉर्न वाजवत राहतात. (वार्ताहर)