सिद्धार्थ हॉस्टेलवर मुंबई पालिकेची धडक कारवाई

By Admin | Updated: February 10, 2015 02:50 IST2015-02-10T02:50:06+5:302015-02-10T02:50:06+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वडाळा येथील सिद्धार्थ विहार या हॉस्टेलवर पालिका अधिका-यांनी सोमवारी धडक कारवाई केली.

Siddhartha hostel's action against the Mumbai Municipal Corporation | सिद्धार्थ हॉस्टेलवर मुंबई पालिकेची धडक कारवाई

सिद्धार्थ हॉस्टेलवर मुंबई पालिकेची धडक कारवाई

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वडाळा येथील सिद्धार्थ विहार या हॉस्टेलवर पालिका अधिका-यांनी सोमवारी धडक कारवाई केली. हॉस्टेलमध्ये राहत असलेले विद्यार्थी तसेच अन्य लोकांना पालिका कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात धोकादायक इमारतीमधून बाहेर काढले. पालिका कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करीत येथे निदर्शने केली.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलवर सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पालिका अधिकारी व कर्मचारी पोलीस बंदोबस्तात पोहोचले. हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या विद्यार्थी तसेच अन्य लोकांना बाहेर काढले. तसेच बंद खोल्यांचे दरवाजे तोडण्यात आले. पालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केल्यामुळे हॉस्टेलमध्ये असलेले विद्यार्थी प्रचंड संतप्त झाले होते. अखेर विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या गेटसमोर जमून पालिका, पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
१९८५ - ९० पासून या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंद केले आहे. तरीही राज्यभरातील शेकडो विद्यार्थी बीकॉम, बीए, पीएच.डी., विधी शाखेचे शिक्षण घेणारे तब्बल ९० विद्यार्थी आणि ५० रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते येथे वास्तव्य करीत आहेत. पालिकेने या इमारतीला एप्रिल २०१४मध्ये धोकादायक ठरवत नोटीस दिली होती. १९६४पासून पीपल्स एज्युकेशन सोसायटीने या हॉस्टेलच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने या इमारतीला पालिकेने धोकादायक ठरवले होते. पालिकेने दोन महिन्यांपूर्वी या इमारतीचे वीज आणि पाणीही कापले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Siddhartha hostel's action against the Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.