सिद्धार्थ दास यांचीही चौकशी
By Admin | Updated: September 4, 2015 01:34 IST2015-09-04T01:34:00+5:302015-09-04T01:34:00+5:30
इंद्राणीचा पहिला पती व शीना बोराचे पिता सिद्धार्थ दास गुरुवारी मुंबईत दाखल झाले.

सिद्धार्थ दास यांचीही चौकशी
मुंबई : इंद्राणीचा पहिला पती व शीना बोराचे पिता सिद्धार्थ दास गुरुवारी मुंबईत दाखल झाले. खार पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. तीन दिवसांत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याच्या सूचना सिद्धार्थ यांना देण्यात आल्या होत्या. इंद्राणीला अटक झाल्यानंतर सिद्धार्थ यांचे नाव प्रकाशझोतात आले. त्यानंतर ते भूमिगत झाले होते. अखेर चेहरा दडवून ते माध्यमांसमोर आले. शीना आपली व इंद्राणीची मुलगी आहे; मात्र आपण इंद्राणीशी लग्न केले नव्हते, असा दावा त्यांनी केला होता. तसेच इंद्राणी ही पैशांवर प्रेम करणारी महत्त्वाकांक्षी महिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
शीनाचा जन्म फेब्रुवारी १९८७मध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र इंद्राणीने शीनाची जन्मतारीख फेब्रुवारी १९८९ अशी नोंदवली होती. चौकशीत शीनाचे पालकत्व, इंद्राणीचा स्वभाव आणि अन्य माहितीबाबत पोलीस सिद्धार्थ यांना प्रश्न विचारत असल्याचे समजते.
‘शीना-क्वीन आॅफ दी जंगल’ हा चित्रपट इंद्राणीसोबत पाहिला होता. पहिली मुलगी झाली तर तिचे नाव शीना ठेवण्याचा निर्णय आम्ही हा चित्रपट पाहताना घेतला, अशी माहिती सिद्धार्थ यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. इंद्राणीच्या वडिलांच्या मदतीने एक बेकरी सुरू केली होती. मात्र ती धड चालत नव्हती. त्यामुळे इंद्राणीने मला सोडून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईला जाऊन स्थिरस्थावर झाल्यानंतर ती मला तिथे बोलवणार होती, असा दावाही त्यांनी केला होता.
दरम्यान, शीनाचे अस्तित्व दाखवण्यासाठी इंद्राणीने ‘शीना’च्या नावे इंटरनेट व ईमेल, मेसेज, पोस्ट्स केल्या. यामुळे तिच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याचा मुंबई पोलिसांचा विचार आहे.
सुटकेस विक्रेत्याचा
लागला शोध : इंद्राणीच्या सांगण्यावरून चालक श्याम राय याने दादरमधून दोन सुटकेस विकत घेतल्या होत्या. त्या सुटकेस विक्रेत्याची ओळख पटली असून, पोलीस त्याचा जबाब नोंदवणार आहेत. सुटकेस विक्रेता फेरीवाला असल्याची माहिती मिळते. एका सुटकेसमध्ये इंद्राणी, संजय यांनी शीनाचा मृतदेह कोंबून तो पेणपर्यंत नेला होता. तर दुसऱ्या सुटकेसमध्ये मिखाईलचा मृतदेह ठेवण्याचा कट होता, असा पोलिसांचा आरोप आहे.
पोलिसांच्या मदतीला सीए
आयएनएक्स वाहिनी विकून आलेल्या पैशांची पीटर व इंद्राणी मुखर्जी यांनी कुठे, कशी गुंतवणूक केली हा किचकट व गुंतागुंतीचा विषय तपासण्यासाठी मुंबई पोलिसांनी चार्टर्ड अकाउंटंटना मदतीला घेतले आहे. हे सीए पोलिसांना शीना बोरा हत्याकांडाचे आरोपपत्र दाखल करेपर्यंत पूर्णवेळ सहकार्य करणार आहेत.
खार पोलिसांनी वरळीतील ए.एम. मोटर्सचे
मालक फैजल अहमद यांचा जबाब नोंदवला आहे. शीना हत्याकांडात वापरलेली ओपेल कोर्सा कार ही याच कंपनीची होती आणि फैजल यांनी ती इंद्राणीला भाड्याने दिली होती. या कारचे बुकिंग पीटर यांनी लंडनहून केले होते, अशी माहिती तपासात पुढे आल्यानंतर पोलिसांनी अहमद यांचा जबाब नोंदवला.
पीटर यांना पोलिसांचे सवाल
शीना आणि राहुलमधले नाते कसे होते?
शीना, राहुल या दोघांशी तुमचे संबंध कसे होते?
शीना, राहुल या दोघांशी इंद्राणीचे संबंध कसे होते?
तुमची इंद्राणीशी पहिली भेट कधी झाली?
शीनाच्या नावे परदेशात मालमत्ता विकत घेतली का?
आयएनएक्स विकून किती पैसे मिळाले?
एप्रिल २०१२मध्ये मिखाईलला मुंबईत बोलावल्याचे तुम्हाला माहीत होते का?
गुन्ह्यात वापर झालेली कार तुम्ही बुक केली होती का?
शीना-राहुल यांचा देहरादूनमध्ये साखरपुडा झाल्याचे समजताच तुम्ही राहुलशी या विषयावर प्रत्यक्ष बोलला होता का?
शीना गायब आहे. शीना अमेरिकेत आहे, हा इंद्राणीचा दावा खोटा आहे. तिचा पासपोर्ट माझ्याकडे आहे, असे राहुलने तुम्हाला सांगितले होते का?
पत्नी इंद्राणीची पार्श्वभूमी तुम्ही कधी तपासून पाहिली होती का? शीना गायब आहे असा संशय तुम्हाला तीन वर्षांत एकदाही का आला नाही?
शीनाला तुम्ही आर्थिक साहाय्य करत होता का?
कुटुंबीय व नातेवाइकांपैकी कोणा-कोणासोबत भारतात आणि परदेशातील बँकांमध्ये तुमचे जॉइंट अकाउंट आहे? त्याचे तपशील द्या.
संजीव खन्नाच्या संपर्कात होता का? तुम्ही कधी त्याला आर्थिक मदत केली होती का?