अनिकेत घमंडी/प्रशांत माने, कल्याण - अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अडीच लाखांच्या प्रचंड मताधिक्याने कल्याणच्या सुभेदारीवर शिक्कामोर्तब केले. मतमोजणीच्या शुभारंभापासूनच सोळा हजारी एक नंबरीची घोडदौड त्यांनी २४ फेर्यांमध्ये कायम ठेवली़ परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर मतमोजणीच्या तिसर्या फेरीतच काढता पाय घ्यावा लागल्याची नामुष्की ओढवली़ तर मनसेचे प्रमोद पाटील यांनाही, कसाबसा सातव्या फेरीपर्यंत तग धरल्यानंतर पराभवाची सावली पाठ सोडत नसल्याने येथून पळ काढावा लागला. २४ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात तब्बल ८ लाख ३० हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी विजयी उमेदवार डॉ़ शिंदे यांना ४ लाख ४० हजार ८९२ मते, तर आनंद परांजपे यांना १ लाख ९० हजार १४३ मते पडली. मनसेच्या पाटील यांना १ लाख २२ हजार ३४९, बसपाच्या दयानंद किरतकर यांना १९ हजार ६४३, तर आम आदमी पार्टीचे नरेश ठाकूर यांना २० हजार ३४७ मतांवर समाधान मानावे लागले. या मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुती, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला जरी दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरीही महायुतीच्या आणि त्यांच्या एकूण मतांमध्ये तब्बल २ लाख ५० हजारांची तफावत असून ही सर्व मते महायुतीच्या पारड्यात पडल्याने मतदान केंद्र परिसरात सकाळी साडेनऊपासून महायुतीच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. त्यात सकाळी १०.३०च्या सुमारास अचानक शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी केंद्र परिसरातील पत्रकार कक्षाकडे कूच केल्याने महायुतीचा विजय निश्चित झाल्याचे संकेत मिळाले होते. कडक सुरक्षा व्यवस्थेनेही शिंदे प्रसिद्धीमाध्यमांना देत असलेल्या प्रतिक्रियांना रोखू न शकल्याने आठव्या राऊंडनंतर तो विजय निश्चित झाल्याचे दिसून आले. यावेळी नरेश म्हस्के, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, उपाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, या विजयात मोलाची कामगिरी बजावलेले भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष सुनील चौधरी, उल्हासनगरचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, डोंबिवलीचे शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पहिल्या फेरीत परांजपेंना ७ हजार १२५, पाटील यांना ६ हजार ९११, तर डॉ. शिंदे यांना २१ हजार ९८६ मते मिळाली होती. तेव्हापासून २४व्या फेरीपर्यंत शिंदे यांनी मागे वळून पाहिलेच नाही, तर अन्य मुख्य प्रतिस्पर्ध्यांना १० हजाराचा टप्पा ओलांडूही दिला नाही. त्यामुळे अन्य दोन पक्षांचे कार्यकर्तेही केंद्र सोडून माघारी परतले. नोटा’ला पसंती या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या उमेदवारांपैकी एकही पसंत नसेल तर मतदारांना ‘नोटा’चा पर्याय निवडणूक आयोगाने दिला होता. त्या पर्यायाला कल्याण लोकसभेतील तब्बल ९ हजार १८५ मतदारांनी आपला अधिकाराचा हक्क बजावत पसंती दिली. त्यामुळे या मतदारसंघातील उपर्यांसह स्थानिक उमेदवारांना नाकारल्याची भावना लोकप्रतिनिधींमध्ये चर्चेत होती. तीन यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड दरम्यान एकूण २४ फेर्यांमध्ये मतदान झालेल्या तीन यंत्रांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड उद्भवला. परिणामी या यंत्रांची मतमोजणी दुपारी ४ पर्यंत होऊ शकली नसल्याचे मतदान केंद्रातून सांगण्यात आले. याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
श्रीकांत शिंदे यांच्याकडे अखेर कल्याणची सुभेदारी!
By admin | Updated: May 17, 2014 02:11 IST