श्रीहरी अणे राज्याचे नवे महाधिवक्ता

By Admin | Updated: October 15, 2015 03:05 IST2015-10-15T03:05:08+5:302015-10-15T03:05:08+5:30

विदर्भातील ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ आणि कट्टर विदर्भवादी नेते श्रीहरी गणेश अणे यांची नियुक्ती

Shreehri Anne's new Advocate General of the state | श्रीहरी अणे राज्याचे नवे महाधिवक्ता

श्रीहरी अणे राज्याचे नवे महाधिवक्ता

मुंबई : विदर्भातील ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ आणि कट्टर विदर्भवादी नेते श्रीहरी गणेश अणे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने तशी शिफारस राज्यपालांकडे केली.
१३ एप्रिल १९५० रोजी पुणे येथे जन्मलेले अ‍ॅड. अणे यांचे शालेय शिक्षण जमशेदपूर येथे झाले, तर पुणे विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली. १९७४ पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली. नागपूर विद्यापीठाचा जनसंवाद विभाग तसेच कामगार संबंध आणि व्यवस्थापन विभागात अध्यापनही केले.
१९९४ ते ९७ या काळात ते नागपूरच्या हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे आजीवन सदस्य आहेत. निष्णात वकील, फर्डे वक्ते असा त्यांचा लौकिक आहे. (विशेष प्रतिनिधी)
कट्टर विदर्भवादी... अ‍ॅड. अणे हे कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखले जातात. आजवर अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी नेतृत्व केले आहे. अरविंद बोबडे, व्ही.आर. मनोहर, सुनील मनोहर आणि रोहित देव यांच्यानंतर विदर्भातील आणखी एका विधिज्ञास महाधिवक्तापदाचा मान मिळाला आहे.
बाळासाहेबांविरुद्ध घेतले होते वकीलपत्र
अ‍ॅड. अणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध याचिका दाखल करणारे हरीश पिंपळखुटे यांच्याविरुद्ध एकेकाळी वकीलपत्र घेतले होते. न्या. अशोक देसाई यांनी बाळासाहेबांना सात दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती. पुढे सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा रद्दबातल ठरविली होती.

Web Title: Shreehri Anne's new Advocate General of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.