‘त्या’ ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस

By Admin | Updated: January 16, 2017 01:55 IST2017-01-16T01:55:50+5:302017-01-16T01:55:50+5:30

बोर्ड प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस पाठविली असून, कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

Show 'cause' to the contractor | ‘त्या’ ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस

‘त्या’ ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस


देहूरोड : गेल्या सहा दिवसांपासून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक दोन, सहा व सातमधील साफसफाईची सर्व कामे संबंधित कामगारांनी ठेकेदाराकडून दोन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याच्या कारणाने बंद केली असल्याने परिसरातील गटारी तुंबलेल्या आहेत. परिसरात व रस्त्यांवर स्वच्छतेअभावी नागरिक हैराण झाले आहेत. बोर्ड प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस पाठविली असून, कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
अद्यापही संबंधित ठेकेदाराने बोर्डाकडे दोन महिन्यांची देयके सादर केलेली नाहीत. दरम्यान, प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून लष्करी भागातील बोर्डाचे सफाई कामगार अगर उर्वरित वॉर्डांतील दुसऱ्या ठेकेदाराकडील कामगारांमार्फत साफसफाईची कामे करून घ्यावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बोर्डाच्या हद्दीतील तीन वॉर्डांत गेले आठवडाभर साफसफाई होत नसल्याने संबंधित भागातील गटारी तुंबल्या असून, परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर व परिसरात कमालीची अस्वच्छता पसरली आहे. दुर्गंधीने नागरिक हैराण आहेत. संबंधित वॉर्डांतील साफसफाईचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने ४० सफाई कामगारांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून दिले नाहीत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराला काम थांबविल्याबाबत लेखी नोटीस पाठविण्यात आली आहे. संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता लवकरच तीनही वॉर्डांत सफाईची कामे सुरु करणार असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात येत आहे. अस्वच्छता दूर करण्यासाठी नागरिकांकडून पर्यायी व्यवस्था करण्याबाबत मागणी होत असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून गेले काही दिवस नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काम करीत होतो. मात्र, आणखी किती दिवस पगारशिवाय काढणार? पगार झाल्याशिवाय काम सुरु करणार नाही असे एका कामगाराने स्पष्ट केले आहे. दरम्यान, चिंचोलीत दोन-तीन कामगारांनी बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार काही मोजक्या तुंबलेल्या गटारी साफ केल्या आहेत. (वार्ताहर)
>स्वच्छतेसाठी पर्यायी व्यवस्था
ठेकेदाराकडील कामगारांनी तीन वॉर्डांत सफाईची काम थांबविल्याने नागरिकांची गैरसोय झाली हे वास्तव आहे. संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्यात आली आहे. संपर्कही साधण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास पर्यायी व्यवस्था करून संबंधित भागातील साफसफाईची कामे पूर्ण केली जातील .
- अभिजित सानप, मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड.

Web Title: Show 'cause' to the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.