अॅन्टीरेबिजसाठी दाखवा बीपीएलचे कार्ड
By Admin | Updated: September 28, 2015 02:33 IST2015-09-28T02:33:45+5:302015-09-28T02:33:45+5:30
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कुत्र्यांचे हल्ले व त्यात अॅन्टीरेबिजची लस मेडिकल प्रशासन फक्त बीपीएल रुग्णांसाठीच उपलब्ध करून देत

अॅन्टीरेबिजसाठी दाखवा बीपीएलचे कार्ड
नागपूर : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कुत्र्यांचे हल्ले व त्यात अॅन्टीरेबिजची लस मेडिकल प्रशासन फक्त बीपीएल रुग्णांसाठीच उपलब्ध करून देत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेडिकलमध्ये या नियमाचा फटका दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) आणि सामान्य रुग्णांना बसत आहे.
श्वान चावल्यानंतर प्राण वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अॅन्टीरेबिज लस असते. मेडिकल प्रशासन फक्त दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) रुग्णांसाठीच ही लस उपलब्ध करून देते. दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) कार्डधारकांसह इतर रुग्णांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जाते किंवा महापालिकेच्या रुग्णालयाकडे बोट दाखविले जाते. विशेष म्हणजे, मेडिकलपासून काही अंतरावर असलेल्या मनपाच्या आयसोलेशनमध्ये अशा रुग्णांची गर्दी वाढल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. आता महाल येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात आणि इंदिरा गांधी इस्पितळात ही सेवा उपलब्ध आहे. मेडिकलपासून ही दोन्ही इस्पितळे बरीच लांब आहेत. यातच ही लस ३०० ते ४०० रुपयांची असल्याने गरीब रुग्ण अडचणीत येतो. विशेष म्हणजे, महापालिकेच्या इस्पितळांवर ग्रामीण रुग्णांचाही भार राहत असल्याने तुटवडा नेहमीच पडतो. यावर उपाय म्हणून मेडिकलमध्ये सर्व रुग्णांसाठी ही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून आहे. (प्रतिनिधी)