राजपुरीत गाळामुळे होडी व्यावसायिकांना फटका

By Admin | Updated: April 30, 2016 02:53 IST2016-04-30T02:53:28+5:302016-04-30T02:53:28+5:30

जंजिरा जलदुर्ग तसेच दिघी बंदराला जाण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण अर्थात राजपुरी जंजिरा जलवाहतूक संस्थेतर्फे प्रवाशांची ने - आण केली जाते.

Shot in Rajpuri due to shock | राजपुरीत गाळामुळे होडी व्यावसायिकांना फटका

राजपुरीत गाळामुळे होडी व्यावसायिकांना फटका

मुरुड : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या जंजिरा जलदुर्ग तसेच दिघी बंदराला जाण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण अर्थात राजपुरी जंजिरा जलवाहतूक संस्थेतर्फे प्रवाशांची ने - आण केली जाते. तथापि राजपुरी बंदर गाळाने पूर्ण भरल्यामुळे किनाऱ्यावर होड्या लागू शकत नाहीत. विशेषत: ओहोटीचे वेळी २-३ तास रखडपट्टी होते. राजपुरी बंदरावर प्रवाशांच्या वाहतुकीवर परिणाम होतो तसेच बंदरालगत १९ व्यावसायिकांच्या धंद्यावरही फटका बसतो आहे. मेरीटाईम बोर्डाने बंदरातील गाळ उपसून देण्याची मागणी जलवाहतूक संस्थेचे चेअरमन इकबाल शिर्सीकर यांनी केली आहे.
बंदरातील गाळ गेल्या १०-११ वर्षांपासून उपसलेला नाही. दिघी पोर्टच्या ड्रेझिंगमुळे राजपुरी पकटीवर मोठ्या प्रमाणावर पुळण आल्याचे बुजुर्ग सांगतात. राजपुरी मुस्लीम समाजातील सुमारे १५० ते २०० कुटुंबे ही जल बोट सेवा तसेच येणाऱ्या पर्यटकांवर मदार ठेवून आहेत. तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग नाही. स्वाभाविक नारळपाणी, फॅन्सी वस्तू, टोपी सेंटर, मिनरल वॉटर, सरबत, कोल्ड्रिंक, पाववडा सेंटर आदी १९ लहान - मोठे धंदेवाईक राजपुरी बंदरात कार्यरत आहेत. अर्थात जंजिरा जल वाहतूक संस्थेने मेरीटाईम बोर्डाकडे बंदरातील गाळ उपसण्यासाठी निवेदनही ३-४ वेळेस दिली आहेत. जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या शिडांच्या होड्यांना पार्र्किंग करताना खूपच कसरत करावी लागते. तरी मेरीटाईम बोर्डाने वरील समस्यांचा गांभीर्याने पाठपुरावा करुन कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
किल्ल्यावर ने-आण करण्यासाठी १३ होड्या असून पर्यटकांना यातून सुरक्षितपणे किल्ल्यावर पोहचवले जाते. प्रत्येक तिकिटामागे एक रुपया लेव्हीकर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला दिला जातो. या होड्यांवर सुमारे ६० कर्मचारी तैनात असून त्यांना दरमहा ६००० पगार दिला जातो. येथील मुस्लीम तरुण स्वत:च्या अक्कल हुशारीने गाइडचे काम करुन अधिक अर्थार्जन करतात.
राजपुरी ते जंजिरा किल्ला हे टेंडर रायगड जिल्हा परिषदेमार्फत काढले जाते व या कामाचा ठेका जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजपुरी यांना प्राप्त झाला आहे. सदरच्या रोजच्या जलवाहतुकीमुळे सुमारे ६० मुस्लीम युवकांना रोजगार मिळाल्याने त्यांचा उदरनिर्वाह होण्यास मदत होते. जून ते आॅगस्ट महिन्यापर्यंत येथील वाहतूक बंद असते या तीन महिन्यात येथील तरुणांना घरी बसावे लागते.
या संदर्भात जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेचे व्यवस्थापक नाझीम कादरी म्हणाले की, पर्यटकांना आम्ही चांगल्या सुविधा तसेच गाइड पुरवितो. मेरीटाईम बोर्डाने नवीन जेट्टीमुळे पर्यटकांना याचा निश्चित फायदा होणार आहे. परंतु या जेट्टीचे उद्घाटन न झाल्याने ही जेट्टी खुली करण्यात आलेली नाही. महागाईच्या प्रमाणे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने किल्ल्यावर येवून - जावून ५० रुपये तिकीट दराची परवानगी देणे आवश्यक आहे. अल्प अशा २० रुपयांत संस्थेला तोटा सहन करावा लागत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
संस्थेचे चेअरमन इरफान कारभारी म्हणाले की, पर्यटक आम्हाला नेहमी सहकार्य करतात. जास्तीत जास्त लोकांनी किल्ला पहावा अशी इच्छा यावेळी त्यांनी जाहीर केली. राजपुरी ग्रामपंचायत सरपंच हिरकणी गिदी जंजिरा किल्ल्यामुळे आमच्या राजपुरी गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटक उपकरामधून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा फायदा होतो. पर्यटक हे आमचे सर्वस्व असून त्यांना वेगवेगळ्या सुविधा देण्याकडे कल असतो. त्यामुळे बोर्डाचेही सहकार्य अपेक्षित आहे.

Web Title: Shot in Rajpuri due to shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.