धक्कादायक ! पुण्यात एकतर्फी प्रेमातून स्वत:ला गाडीत पेटवून आत्महत्या
By Admin | Updated: April 9, 2016 15:33 IST2016-04-09T15:33:50+5:302016-04-09T15:33:50+5:30
गाडी पेटली नसून आत्महत्या करण्यासाठी चालकाने गाडी पेटवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे ही आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे

धक्कादायक ! पुण्यात एकतर्फी प्रेमातून स्वत:ला गाडीत पेटवून आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. ९ - हडपसरमध्ये गाडीला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गाडी पेटली नसून आत्महत्या करण्यासाठी चालकाने गाडी पेटवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे ही आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. प्रेयसीने दुस-या तरुणासोबत लग्न केल्याने तिच्याच घरासमोर गाडीमध्ये स्वत:ला पेटवून देऊन ही आत्महत्या केली आहे.
हडपरच्या ग्लायडिंग सेंटरजवळ शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ओमनी कारने अचानक पेट घेतल्याने कारचालक अजित आत्माराम इंगळेचा होरपळून मृत्यू झाला होता. अपघाताने ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. तसंच आग लागलेली मारुती व्हॅन ही गॅसकिटवर चालणारी असल्यामुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. पोलिसांनी याप्ररणी तपास केला असता वेगळीच माहिती समोर आली. ज्यामध्ये एकतर्फी प्रेमातून आत्महत्या करण्यासाठी अजितने गाडीला आग लावल्याचं उघड झालं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजित इंगळेचं एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या लग्नाला कुटुंबियांनी नकार दिल्यानंतर मुलीने दुस-या मुलाशी लग्न केले होते. मात्र तरीही अजित तिचा पाठलाग करत होता. त्याने नकार दिल्यास तिच्या घरासमोर आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती. गुढीपाडवा साजरा करण्यासाठी तरुणी माहेरी आल्याची माहिती मिळाल्यावर अजित फलटणवरुन कार घेऊन आला. तिच्या घरासमोरच त्याने गाडीच्या काचा बंद करुन स्वत:ला पेटवून घेतले. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत अजितचा मृत्यू झाला होता.