धक्कादायक... विजेचे झटके देऊन युवतीवर बलात्कार
By Admin | Updated: October 20, 2016 23:16 IST2016-10-20T23:16:06+5:302016-10-20T23:16:06+5:30
ओळखीचा गैरफायदा घेत तासगावातील तरुणाने इचलकरंजीतील तरुणीवर सातत्याने बलात्कार केल्याचा तसेच वेळोवेळी तिला विजेचे झटके देऊन मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला

धक्कादायक... विजेचे झटके देऊन युवतीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
तासगाव (जि.सांगली), दि. २० : डान्स शिकवणी काढण्याचा बहाणा करुन झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तासगावातील तरुणाने इचलकरंजीतील तरुणीवर सातत्याने बलात्कार केल्याचा तसेच वेळोवेळी तिला विजेचे झटके देऊन मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी मयूर दत्तात्रय पवार (रा. स्टेट बँकेजवळ, काशिपुरा गल्ली, तासगाव) यास अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मयूरचा सख्खा भाऊ चैतन्य याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
पीडित युवती व मयूर पवार या दोघांची ओळख सहा वर्षांपूर्वी एका डान्स स्पर्धेत झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या डान्स स्पर्धेत त्यांची भेट होत राहिली. दीड वर्षापूर्वी मयूरने युवतीच्या घरी जात ‘आपण तासगावमध्ये डान्सच्या शिकवणीचे वर्ग घेऊ’, असे सांगून तासगावला येण्यास भाग पाडले. दर शनिवारी व रविवारी शिकवणी असल्याने संबंधित युवती शिकवणीच्या जागेतच राहत होती. सहा महिन्यांपूर्वी मयूरने तिला एकटी पाहून जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. यानंतर त्याने वारंवार संशयावरून तिला मारहाण केली.
आठ दिवसांपूर्वी संबंधित युवतीने लग्न ठरले. मात्र मयूरने ‘तुझ्या व्हिडीओ क्लिप्स पाहिजे असतील तर तू मला सांगलीत भेटायला ये’, अशी धमकी दिली. यानंतर युवती घाबरून त्याला सांगलीत भेटण्यास आली. मात्र मयूरने तिला जबरदस्ती तासगावला डान्स शिकवणी वर्गामध्ये आणून विजेचे झटके दिले. संबंधित प्रकारानंतर युवतीने स्वत:ची सुटका करून घेत तेथून पळ काढला. त्यानंतर घरच्यांसोबत तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर मयूर पवार यास अटक करण्यात आली.