-चंद्रशेखर बर्वे, नवी दिल्लीMost Cancer Patients in Maharashtra: भारतातील महिला आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मागील १० वर्षात कॅन्सर रुग्णांची संख्या साडेपाच लाखांनी वाढली असून सध्या भारतात कॅन्सरचे १५ लाख ७० हजार रुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर २०४० पर्यंत कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाखांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाज जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वर्तविला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरानुसार, भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा आणि महिलांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
हेही वाचा >>खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणतात...
याशिवाय पुरुषांमध्ये मुख आणि प्रोस्टेटचे तर महिलांमध्ये गर्भाशय आणि डिंबग्रंथी (ओवरी) चा कर्करोग वाढण्याचे प्रमाण जास्त आहे.
भारतात दहा वर्षात किती रुग्ण वाढले?
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार, भारतात सध्या कॅन्सरचे १५ लाख ६९ हजार ७९३ रुग्ण आहेत. २०१५ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात पाच लाख ४७ हजार १५ रुग्ण वाढले आहेत.
एक लाख लोकांमागे १०० जण कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. मात्र, २०४० पर्यंत देशातील कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाख १८ हजार ६९४ वर पोहोचण्याची शक्यता ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्वेटरी, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आईएआरसी) ने वर्तविली असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत दिली.
महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन (४८,२४,७०३), तर दुसऱ्या स्थानी अमेरिका (२३,८०,१८९) आहे.
कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक (२,२१,०००) रुग्ण आहेत.
कोणत्या राज्यात किती कॅन्सर रुग्ण?
महाराष्ट्र (१,२७,५१२), पश्चिम बंगाल (१,१८,९१०), बिहार (१,१५,१२३) आणि तामिळनाडू (९८,३८६) रुग्ण आहेत. महाराष्ट्रात २०२० मध्ये १,१६,१२१ रुग्ण होते. २०२४ पर्यंत हा आकडा १,२७,५१२ वर पोहोचला आहे. अर्थात, पाच वर्षात ११ हजार ३९१ रुग्ण वाढले आहेत.