जादा वीजबिलामुळे ‘शॉक’
By Admin | Updated: August 3, 2016 01:14 IST2016-08-03T01:14:29+5:302016-08-03T01:14:29+5:30
इलेक्ट्रिक मीटर फसवे आणि हलक्या दर्जाचे असल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त बिले येऊ लागली आहेत.

जादा वीजबिलामुळे ‘शॉक’
दौंड : शहरात विद्युत महावितरण कंपनीने बसविलेले इलेक्ट्रिक मीटर फसवे आणि हलक्या दर्जाचे असल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त बिले येऊ लागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीस आला आहे. महावितरण कंपनीने फसवे मीटर तातडीने बदलावेत; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष फिरोज खान, माजी अध्यक्ष सुनील शर्मा यांनी विद्युत वितरण कंपनीला दिला आहे.
तीन महिन्यांपासून दौंड शहरातील नागरिकांना जास्त प्रमाणात बिले येऊ लागली आहेत. या संदर्भात विद्युत महावितरण कंपनीकडे तक्रार केली असता रीडिंगप्रमाणे बिले घेतली जातात, असे सांगितले जाते. मात्र, शहरात बसविलेल्या मीटरची रीडिंग क्षमता जास्त असल्याने ग्राहकांना बिले जास्त येऊ लागली आहेत.
बऱ्याच ग्राहकांना नवीन मीटरदेखील दिले आहेत; मात्र ते बदलून देण्याचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जातो, हे धोरण चुकीचे आहे. तसेच, तांत्रिक बिघाड असल्याने मीटरमध्ये ग्राहकांना कधी जास्त, तर प्रमाणापेक्षा जास्त बिल येते. परिणामी विद्युत वितरण कार्यालयाकडे जास्त प्रमाणात तक्रारी येत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. कार्यालयातील काही अधिकारी अरेरावीची भाषा करतात. एकंदरीतच, परिस्थिती पाहता ज्यादा बिल आकारणीमुळे नागरिक हैराण झाला आहे. त्यातच नियम धाब्यावर ठेवून ग्राहकाच्या असहायतेचा फायदा घेऊन विद्युत वितरण कंपनीने वसुली सुरू केली आहे, ती तातडीने थांबवावी. मीटर योग्य असल्याची खात्री करावी, दर्जेदार मीटर बसवावेत जेणेकरून ग्राहकांना वाजवीपेक्षा जास्त बिल येणार नाही तसेच शहरात ६ कोटी रुपये खर्च करून भूमिगत विद्युत्वाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, भूमिगत विद्युत्वाहिनीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. तेव्हा या योजनेची चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
<वारं आलं, तरी बत्ती गुल होते
सध्याच्या परिस्थितीत विजेचा लपंडाव शहरात सुरू आहे. साधी वाऱ्याची झुळूक आली किवा भुर्भुर् पाऊस आला, तरी वीजपुरवठा खंडित केला जातो. याचा उपद्रव नागरिकांना होतो. तरी, शहरातील वीजपुरवठा खंडित होणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.