सहलीसाठी गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू
By Admin | Updated: February 2, 2015 05:05 IST2015-02-02T05:05:49+5:302015-02-02T05:05:49+5:30
शाळेच्या सहलीमध्ये धमाल-मस्ती करीत असताना शॉक लागून एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मालाड येथे घडली.

सहलीसाठी गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू
मुंबई : शाळेच्या सहलीमध्ये धमाल-मस्ती करीत असताना शॉक लागून एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मालाड येथे घडली. सय्यद जाफरी असे या मृत मुलाचे नाव असून, तो गोवंडीच्या जाफरी इंग्लिश हायस्कूलमधील दहावीचा विद्यार्थी होता.
गोवंडी-शिवाजीनगर येथील प्लॉट नंबर २९ येथे हे जाफरी इंग्लिश हायस्कूल आहे. दरवर्षाप्रमाणे शाळेची शैक्षणिक सहल काढण्याची योजना शाळेकडून महिनाभरापूर्वीच आखण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी शाळेतील ३२४ विद्यार्थ्यांसह १९ शिक्षक मालाडमधील सायना रिसॉर्टमध्ये दाखल झाले.
रिसॉर्टमध्ये सर्व मुले खेळत असतानाच सय्यद जाफरी हा अचानक एका झाडाजवळ पडला. काही विद्यार्थ्यांनी ही बाब शिक्षकांच्या कानावर घातल्यानंतर त्याला आकडी आली असावी, असे त्यांना वाटले. त्यामुळे रिसॉर्टमधील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने या मुलाला मढ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मालवणी पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. प्राथमिक तपासात हा मृत्यू कशाने झाला याबाबत काहीच कल्पना नसल्याने पोलिसांनी हा मृतदेह भगवती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. आज पोलिसांकडे हा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सय्यदचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी त्याच्यासोबत असलेल्या काही मित्रांकडे चौकशी केली असता, तलावात पोहून झाल्यानंतर तो रिसॉर्टमध्येच एका आंब्याच्या झाडावर कैऱ्या काढण्यासाठी चढला होता. मात्र तो कसा खाली पडला याबाबत काहीच माहीत नसल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र या आंब्याच्या झाडाजवळून काही विजेच्या उघड्या तारा होत्या. या विजेच्या झटक्यानेच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत मालवणी पोलिसांनी सायना रिसॉर्ट चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
> गोवंडीत शोकाकूल वातावरण
शिवाजीनगर परिसरातील प्लॉट नंबर १७ येथे सय्यद आई आणि त्याच्या दोन मोठ्या बहिणींसोबत राहत होता. त्याचे वडील कामानिमित्त आखाती देशात आहेत. नेहमी हसमुख आणि सर्वांमध्ये मिसळणाऱ्या सय्यदच्या निधनाची बातमी समजताच सर्वांना मोठ्ठा धक्का बसला. शिवाय दोन बहिणींनंतर हा एकच मुलगा असल्याने कुटुंबीयांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला. (प्रतिनिधी)