५00 एसी बसेस बनणार ‘शिवशाही’
By Admin | Updated: December 8, 2015 01:19 IST2015-12-08T01:19:52+5:302015-12-08T01:19:52+5:30
सटीकडून भाडेतत्त्वावर सुरुवातीला ५00 एसी व स्लीपर एसी बसेस घेण्यात येणार असून, त्या ताफ्यात येण्यापूर्वीच त्याचे ‘शिवशाही’ नावाने नामकरण केले आहे.

५00 एसी बसेस बनणार ‘शिवशाही’
मुंबई : एसटीकडून भाडेतत्त्वावर सुरुवातीला ५00 एसी व स्लीपर एसी बसेस घेण्यात येणार असून, त्या ताफ्यात येण्यापूर्वीच त्याचे ‘शिवशाही’ नावाने नामकरण केले आहे. या बसेसची रंगसंगती, आराखडा ठरविण्याकरिता ‘शिवशाही’ रंगसंगती स्पर्धाही आयोजित केली असून, स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस या दोन सेवा प्रकारांचा समावेश आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. १0 डिसेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून, रंगसंगती, आराखडा पाठविण्याची अंतिम मुदत १६ डिसेंबर आहे.
या स्पर्धेसाठी पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिकासाठी ५ लाख, द्वितीय पारितोषिकासाठी ३ लाख आणि तृतीय पारितोषिकासाठी २ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्पर्धकांना बक्षीस दिल्यानंतर आराखडा, रेखाचित्रे यांची मालकी एसटी महामंडळाची राहणार आहे. त्यावर विजेत्याला कोणताही अधिकार राहणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता असताना त्या वेळी एसटी महामंडळाकडून लाल डब्याचा रंग बदलण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली आणि या स्पर्धेनंतर बसेसना नारिंगी रंग देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षांपूर्वी ‘अश्वमेध’
या कोट्यवधी रुपयांच्या एसी
बसची रंगसंगती ठरविण्यासाठी
स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा घेतल्यानंतर बसची रंगसंगती निश्चित करण्यात आली. या दोन्ही स्पर्धांनंतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस मिळाले नाही, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)