पारसकरांना शिवसेनेचा पाठिंबा
By Admin | Updated: August 2, 2014 11:24 IST2014-08-02T10:15:50+5:302014-08-02T11:24:36+5:30
मुंबईचे डीआयजी सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप असतानाच शिवसेनेने त्यांना पाठिंबा देत या प्रकरणातील सत्य प्रथम शोधून काढावे अशी भूमिका घेतली आहे

पारसकरांना शिवसेनेचा पाठिंबा
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २ - मुंबईचे डीआयजी सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप असतानाच शिवसेनेने त्यांना पाठिंबा देत या प्रकरणातील सत्य प्रथम शोधून काढावे अशी भूमिका घेतली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून पारसकरांची पाठराखण करण्यात आली आहे. पारसकर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिका-यावर एका मॉडलने लावलेल्या आरोपांमुळे मोठी सनसनाटी निर्माण झाली असून 'मराठी व हिंदी चॅनेलवाले' या संशयित बलात्कार प्रकरणास खमंग फोडणी देत असल्याचा आरोप लेखातून करण्यात आला आहे. पोलीस सेवेत बरीच वर्षे काढलेल्या व उत्तम सेवा बजावलेल्या एका अधिकार्यावर एका मॉडेलने आरोप केल्यावर तो सरळ खलनायक ठरतो हे दुर्दैवी आहे. या प्रकरणातील सत्य नक्की काय आहे, याचा खुलासा योग्य वेळी होईलच, पण तोपर्यंत त्यांची फरफट होऊ नये, असे सांगत अशी प्रकरणे हाताळताना कायद्याने दुसरी बाजू देखील लक्षात घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
अग्रलेखातील मुद्दे :
- 'विनयभंग’ आणि ‘बलात्कारा’चे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे ही आता एक फॅशन झाली की काय, असा प्रश्न अधूनमधून लोकांना पडत असतो. हायफाय’ सोसायटीत मात्र ‘विनयभंग’, ‘बलात्कार’ असे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा प्रकरणांमधील सत्य बाहेर यायचे तेव्हा येईल, पण तोपर्यंत त्या संशयित आरोपींची यथेच्छ धुलाई व ‘मीडिया ट्रायल’ नावाचा जो प्रकार चालतो ते सर्वच किळसवाणे आहे
- सध्या आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांचे एक प्रकरण चघळले जात आहे. एका मॉडेलने (?) डीआयजी सुनील पारसकरांवर विनयभंग व बलात्काराचा आरोप केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्याचे हे प्रकरण असल्याने मोठीच सनसनाटी निर्माण झाली आहे. मराठी व हिंदी चॅनेलवाले ‘वारदात’, ‘सनसनाटी’ अशा गुन्हेविषयक कार्यक्रमांतून बलात्काराचा ‘आंखो देखा हाल’ दाखवून जणू हा बलात्कार आपण उघड्या डोळ्यांनी पाहिला असे दर्शवीत आहेत. या संशयित बलात्कार प्रकरणास खमंग फोडणी देऊन वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहे.
- पोलीस सेवेत बरीच वर्षे काढलेल्या व उत्तम सेवा बजावलेल्या पारसकरांसारख्या अधिकार्यावर एक ‘मॉडेल’ सरळ बलात्काराचा आरोप करते व एका रात्रीत तो पोलीस अधिकारी खलनायक ठरवला जातो यास काय म्हणावे! चारित्र्यहनन, बदनामी हे राजकारणात व सरकारात मोठेच हत्यार झाले आहे आणि ते एकमेकांचा काटा काढण्यासाठी वापरले जात आहे. कायदा हा सर्वस्वी महिलांच्या बाजूने आहे, पण म्हणून अशा कायद्याचा गैरवापर करून कोणी कुणास सुळावर चढवीत असेल तर न्यायदेवतेने डोळ्यांवरची पट्टी सोडून व हातातील तराजू बाजूला ठेवून कायद्याचे अर्थ लावायला हवेत. इतके दिवस मधुर संबंध असताना ‘बलात्कार’ कसा झाला? हा प्रश्न सामान्यांना पडतो, पण पोलिसांना पडत नाही.
- बलात्कार हा अत्यंत किळसवाणा व भयंकर प्रकार आहे आणि कुठलीही स्त्री हा कलंक क्षणभरही बाळगू शकत नाही, पण सध्या बलात्काराचे आरोप व तक्रारी घटना घडल्यानंतर सहा-सहा महिन्यांनी आणि दोन-दोन वर्षांनी दाखल होतात व त्यावर कोणीच प्रश्नचिन्ह निर्माण करीत नाही. अशा ‘पीडित’ तरुणींविषयी कायद्याने व समाजाने सदैव सहानुभूती तसेच पाठिंबा दर्शविला पाहिजे, पण सत्य काय आहे, नाण्याची दुसरी बाजू काय आहे तेसुद्धा पाहायला हवे.
- असेच एक प्रकरण अलीकडेच घडले होते. मुंबई पोलीस दलातील एक बहाद्दर अधिकारी अरुण बोरुडे यांच्यावर असेच आरोप झाले. शेवटी त्यांनी आत्महत्या केली व त्यानंतरच्या तपासात बोरुडे हे निर्दोष ठरले. पोलिसांनी अशा ‘सनसनाटी’ प्रकरणात एक ‘पार्टी’ होऊ नये.
- बलात्काराचे आरोप हे मोठ्यांच्या विरोधात हत्यार झाले आहे व त्या हत्यारास धार देण्याचे काम अनेकदा वर्तुळातले स्वजन किंवा विरोधक मोठ्या आस्थेने करीत असतात. पारसकर प्रकरणातील सत्य नक्की काय आहे, याचा खुलासा योग्य वेळी होईलच, पण तोपर्यंत त्यांची फरफट होऊ नये एवढेच. पोलीस खात्यातील लोकांनी तरी संयमाने हे प्रकरण हाताळावे. विनयभंग, बलात्कार हा प्रकार अमानुष आहेच, पण अशा प्रकारचे खोटे आरोप करून स्त्रीत्वाचा गैरफायदा घेण्याचे प्रकारही समस्त महिलावर्गास आरोपीच्या पिंजर्यात उभे करीत आहेत. बाकी सत्य-असत्याची पडताळणी करण्यास न्यायदेवता सक्षम आहेच!