विधानसभा उपाध्यक्षपदाबाबत शिवसेनेची अळीमिळी गुपचिळी
By Admin | Updated: December 23, 2014 23:41 IST2014-12-23T23:41:20+5:302014-12-23T23:41:20+5:30
विधानसभा उपाध्यक्षपदाबाबत तातडीने चर्चा करून हे पद शिवसेनेकडे येईल, याकरिता प्रयत्न करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यां

विधानसभा उपाध्यक्षपदाबाबत शिवसेनेची अळीमिळी गुपचिळी
संदीप प्रधान, नागपूर
विधानसभा उपाध्यक्षपदाबाबत तातडीने चर्चा करून हे पद शिवसेनेकडे येईल, याकरिता प्रयत्न करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देऊनही त्यादृष्टीने शिवसेनेच्या गटनेत्यांनी व मंत्र्यांनी कुठलीच हालचाल न केल्याने आता या पदावरील दावा करण्याकरिता शिवसेनेला मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत थांबावे लागणार आहे.
विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून दोन्ही काँग्रेसमध्ये संघर्ष झाला. सभागृहाचे कामकाज बंद पाडले गेले. परस्परांवर आरोप केले गेले. त्यामुळे विधी व न्याय विभाग, राज्याचे अॅडव्होकेट जनरल आणि विधिमंडळ सचिवालय यांचे मत घेण्यात आले. यामुळे अखेर दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडली.
शिवसेनेने विधानसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा केलेला नाही किंवा भाजपाने त्यादृष्टीने विधिमंडळ सचिवालयाशी सल्लामसलत केलेली नाही, असे विधिमंडळ सचिवालयाकडून समजते. अधिवेशन काळात उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी व त्यापूर्वीही उपाध्यक्षपद शिवसेनेच्या विजय औटी यांच्याकडे येण्याकरिता दावा दाखल करण्याचा आदेश दिला होता.
याबाबत विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांना विचारले असता उपाध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू असून हळूहळू सर्व निर्णय होतील, असे ते म्हणाले.
सत्तेची पदे मिळाल्याने शिवसेनेचे मंत्री भाजपाबाबत मवाळ झाले की काय, अशी भावना काही आमदारांनी उद्धव यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. केंद्र सरकारच्या गुडस अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करण्याचे आदेश उद्धव यांनी दिले असताना, त्यावरही शिवसेनेचे आमदार गप्प बसून राहिले.
जैतापूर प्रकल्प पूर्ण करणार, अशी ठाम भूमिका भाजपाने सभागृहात घेतली तेव्हा त्याचा प्रतिवाद करण्याकरिता शिवसेनेचा एकही मंत्री विधान परिषदेत हजर राहिला नाही, याबाबत आमदार आश्चर्य व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)