शिवसेनेचे मंत्री अधिकारांवरून नाराज
By Admin | Updated: December 17, 2014 02:54 IST2014-12-17T02:54:40+5:302014-12-17T02:54:40+5:30
शिवसेनेला दिलेल्या पर्यावरण, राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या खात्यांकडे फारसे अधिकार नसल्याने रामदास कदम, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे समजते.

शिवसेनेचे मंत्री अधिकारांवरून नाराज
संदीप प्रधान, नागपूर
शिवसेनेला दिलेल्या पर्यावरण, राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या खात्यांकडे फारसे अधिकार नसल्याने रामदास कदम, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे समजते. ऊर्जा, जलसंपदा यासारखी महत्वाची खाती शिवसेनेला मिळावीत याकरिता मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरण्याचा विचार शिवसेनेत सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही मंत्री झालेल्या सुभाष देसाई यांच्याबाबत शिवसेना आमदारांत तीव्र नाराजी असून शिवसेनेला मिळालेल्या उद्योग खात्यावर त्यांनी कब्जा केल्याबद्दल सहकारी मंत्रीही नापसंतीचा सूर काढत आहेत.
रामदास कदम व एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला मिळालेल्या खात्यांबाबत नापसंती व्यक्त केल्याचे कळते. पर्यावरण खात्यामधील दोन-तीन प्रमुख समित्यांना निर्णयाचे अधिकार आहेत. त्यामुळे मंत्रीपद नाममात्र असल्याची तक्रार कदम यांनी केल्याचे समजते तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मंत्रीपदापेक्षा विरोधी पक्षनेतेपद अधिक महत्वाचे होते. या खात्यात राम नसल्याची भावना शिंदे यांनी ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवल्याचे समजते. शिवसेनेच्यावतीने भाजपासोबत वाटाघाटी करताना सुभाष देसाई यांनी उद्योग खाते मिळवले व ते स्वत:कडे राखले. वस्तुत: हे खाते शिंदे यांना देण्यात येणार होते. परंतु आपण ज्येष्ठ असल्याने हे खाते आपल्याला मिळायला हवे, असा आग्रह देसाई यांनी धरला. शिवसेनेतर्फे वाटाघाटी करणाऱ्या देसाई यांनी हेतूत: बोटचेपी भूमिका घेतल्याने ऊर्जा, जलसंपदा यासारखी खाती शिवसेनेला मिळू शकली नाही, अशी आमदार व मंत्र्यांचीही भावना आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुभाष देसाई यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्री केल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. तीन ते चार टर्म निवडून येऊनही जर पराभूतांना मंत्रीपदाची बक्षिसी मिळणार असेल तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल शिवसेनेचे आमदार करीत आहेत. मंत्रीपदे भरताना मराठवाड्याचाच विचार झाला पाहिजे, असा आग्रह होत आहे.