गुजराती मतदारांसाठी शिवसेनेची फिल्डिंग

By Admin | Updated: October 17, 2016 01:48 IST2016-10-17T01:48:47+5:302016-10-17T01:48:47+5:30

महापालिका निवडणुकीत आपले परंपरागत मतदार कायम ठेवतानाच, अन्य समाजघटकांनाही आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली

Shivsena's fielding for Gujarati voters | गुजराती मतदारांसाठी शिवसेनेची फिल्डिंग

गुजराती मतदारांसाठी शिवसेनेची फिल्डिंग


मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत आपले परंपरागत मतदार कायम ठेवतानाच, अन्य समाजघटकांनाही आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात मराठी अस्मितेचा नारा देणाऱ्या शिवसेनेनेही मराठी मतदारांखेरीज अन्य भाषिक गटांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील गुजराती चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालविला आहे.
शिवसेनेच्या पक्ष संघटनेत शाखाप्रमुखाला कायमच महत्त्वाचे स्थान राहिले आहे. शाखा आणि शाखाप्रमुखांच्या जोरावरच शिवसेनेने स्थानिक पातळीवर आपले मजबूत जाळे विणले आहे. मराठी आणि हिंदू अस्मितेचे राजकारण करतानाही स्थानिक गरजेपोटी शिवसेनेने आतापर्यंत मुस्लीम, उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्यांना पक्ष संघटनेत सामावून घेतल्याची उदाहरणे आहेत. यात आता गुजराती चेहऱ्यांची भर पडली आहे. पश्चिम उपनगरात, विशेषत: बोरीवली, कांदिवली, मालाडसारख्या भागांत गुजराती मतदारांची संख्या मोठी असल्याने, इथे गुजराती चेहरे देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच कांदिवली येथे उदय रुगानी यांच्या रूपाने गुजराती शाखाप्रमुख नेमला असून, त्यांच्याकडे वॉर्ड क्रमांक २०ची जबाबदारी देण्यात आली आहे, तर विकास शाह, जयेश मेहता यांच्याकडे वॉर्ड समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
युतीच्या जागावाटपामुळेच आतापर्यंत गुजरातीबहुल भागात शिवसेनेने निवडणूक लढविली नाही. त्यामुळे गुजराती समाज भाजपाकडे असल्याचा लोकांचा समज आहे. मात्र, शिवसेनेलाही या समाजातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आम्ही अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडले आहोत. गुजरातीबहुल भागातून सेनेने उमेदवार दिल्यास, त्यालाही नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा गुजराती नेत्यांनी केला. केवळ गुजरातीच नव्हे, तर मारवाडी, उत्तर भारतीय आणि मुस्लीम समाजातील लोकही शिवसेनेशी जोडले गेले आहेत. शिवसेनेतील त्यांचे काम आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेत, या सर्व समाजातील लोकांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शाखाप्रमुख तर काही ठिकाणी वॉर्ड समन्वयक म्हणून विविध समाजातील लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजराती चेहऱ्यांमुळे नवीन मतदार जोडण्यासोबतच, भाजपाच्या परंपरागत व्होट बँकेला धक्का देणे शक्य होणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Shivsena's fielding for Gujarati voters