खडसेंच्या राजीनाम्याची शिवसेनेची मागणी
By Admin | Updated: November 28, 2014 02:03 IST2014-11-28T02:03:57+5:302014-11-28T02:03:57+5:30
महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांना दिली.

खडसेंच्या राजीनाम्याची शिवसेनेची मागणी
मुंबई : दुष्काळाने होरपळणा-या शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी त्यांचा अपमान करणारे महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांना दिली.
बिल भरणा-या शेतक-यांनी वीज बिलही भरायले हवे, असे वक्तव्य महसूल मंत्री खडसे यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य शेतक-यांच्या भावना दुखावणारे आणि अपमान करणारे आहे. त्यामुळे खडसेंनी नैतिकदृष्टय़ा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी आपण राज्यपालांकडे केल्याचे शिवसेना नेते कदम म्हणाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळाने आज राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. मराठवाडय़ातील दुष्काळी भागाला दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. यावेळी बोलताना राज्यपालांनी दुष्काळी भागाचा दौरा करण्याचे आश्वासन देतानाच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले.
भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कदम यांनी खडसेंवर टीका करत राज्यपालांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
गांभीर्याने घेण्याजोगे नाही- खडसे
रामदास कदम हे गांभीर्याने घेण्याजोगे नेते नाहीत. त्यामुळे आपला राजीनामा मागण्या इतके कदम मोठे नेते नाहीत, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.