शिवसेनेचे मंत्रिमंडळातील चेहरे बदलणार
By Admin | Updated: April 2, 2017 12:58 IST2017-04-02T12:58:00+5:302017-04-02T12:58:09+5:30
राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

शिवसेनेचे मंत्रिमंडळातील चेहरे बदलणार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांशी फोनवरून चर्चा करून मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सेनेचे मंत्री बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पक्षप्रमुखांनी सध्यातरी सबुरीने घेण्याचे आवाहन केले आहे.
शिवसेनेच्या मंत्र्याबाबत सेना आमदारांबाबत नाराजी आहे. सरकारमधील भूमिकेबाबत सेनेचे मंत्री आणि आमदारांमध्ये मतमतांतर वारंवार दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच सेनेच्या आमदारांनी एका बैठकीत आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले होते. जनतेकडून कर्जमाफीबाबत विचारणा होत आहे. जनतेने आमदारांचे कपडे काढणेच बाकी राहिले आहे, अशा शेलक्या शब्दात सेनेच्या आमदारांनी मंत्र्यांबाबत संताप व्यक्त केला होता.
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर सेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी पक्षबांधणी, केंद्रातील भूमिका, मतदारसंघातील कामे आणि पुढच्या निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी याबाबत चर्चा झाली होती. दरम्यान, पक्षप्रमुखांनी मंत्रिमंडळातील सेनेचे चेहरे बदलण्याचा निर्णय घेतल्यास कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.