भाजपाच्या सोशल बदनामीमागे शिवसेना

By Admin | Updated: November 19, 2014 10:14 IST2014-11-19T10:14:00+5:302014-11-19T10:14:00+5:30

सोशल मीडियातून भाजपाची बदनामी करण्याचे काम शिवसेनेचे कार्यकर्तेच करीत असल्याची माहिती सायबर क्राईमने दिल्याचा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Shivsena on social evils of BJP | भाजपाच्या सोशल बदनामीमागे शिवसेना

भाजपाच्या सोशल बदनामीमागे शिवसेना

अतुल कुलकर्णी, मुंबई
विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याचे सांगत सोशल मीडियातून भाजपाची बदनामी करण्याचे काम शिवसेनेचे कार्यकर्तेच करीत असल्याची माहिती सायबर क्राईमने दिल्याचा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, इमेलचा वापर करीत भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली. कमळाच्या चिन्हात राष्ट्रवादीचे घड्याळ जोडण्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचे चेहरे लावून तयार केलेल्या व्यंगचित्रांपर्यंत एकच धुमाकूळ घातला. सी-सॉसारख्या खेळण्यावर एका बाजूला शरद पवार स्वत:चे वजन टाकून उभे आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला उंचावर नरेंद्र मोदी असल्याचे कार्टूनदेखील गाजले. मात्र या अशा बदनामीने अस्वस्थ झालेल्या फडणवीस यांनी एका बैठकीत हा विषय काढला. त्यावर शेजारीच बसलेल्या सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांना या सगळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले.

चर्चा झाली...
याबाबत खडसे म्हणाले, अशी चर्चा झाली हे खरे आहे. पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील, हे असले मेसेज कोणत्या कॉम्प्युटरवरून जनरेट झाले, याच्या तांत्रिक बाजू तपासून पाहिल्या. यातील ९० टक्के माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून टाकल्याचे समोर आले. आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा मागितला नव्हता आणि आवाजी मतदानाने तो मंजूर केला गेला, असे ते म्हणाले. मात्र या बातमीने भाजपा-शिवसेना एकत्र येण्यास अडसर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

Web Title: Shivsena on social evils of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.