शिवसेना युबीटीचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात एकत्र येण्याबाबत बैठकांवर बैठका सुरु आहेत. नुकतेच उद्धव ठाकरे राज यांच्या निवासस्थानी गेले होते. मुंबई महापालिका निवडणीसह राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. हा एकत्र येण्याचा मुहूर्त ठरल्याची घोषणा माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येत्या विजयादशमीपासून एकत्र दिसणार असल्याचे खैरे म्हणाले. जनतेला दोन भावांचे सरकार हवे आहे, असेही ते पुढे म्हणाले. मुसळधार पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीवर त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. उद्या ते मोरारी बापू यांच्या दर्शनासाठी येत आहेत. धार्मिकता असायलाच हवी, पण प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसामुळे पूर्णता चिखल झाला आहे. पूर्णतः पिक उध्वस्त झालेले आहे. खूप पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. जिल्ह्यात एक प्रकारचा ओला दुष्काळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असे खैरे म्हणाले.