शिवसेना आमदार समितीकडून आढावा दौऱ्याचा ‘फार्स’
By Admin | Updated: January 16, 2016 01:37 IST2016-01-16T01:37:18+5:302016-01-16T01:37:18+5:30
दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा दौरा करून शिवसेनेच्या मंत्री-आमदारांच्या समितीने केलेल्या सूचनांना शासकीय यंत्रणेने केराची

शिवसेना आमदार समितीकडून आढावा दौऱ्याचा ‘फार्स’
नाशिक : दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा दौरा करून शिवसेनेच्या मंत्री-आमदारांच्या समितीने केलेल्या सूचनांना शासकीय यंत्रणेने केराची टोपली दाखविली आहे. महिना उलटला तरी एकाही आश्वासनाची पूर्ती झालेली नाही. परिणामी, समितीचा दौरा फार्सच होता, अशी टीका होऊ लागली आहे.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १२ आमदारांच्या समितीने नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यांनी प्रत्यक्ष साधलेल्या संवादामुळे अनेक गोेष्टींचा उलगडा होऊन शासकीय यंत्रणेचे पितळ उघडे पडले होते. या दौऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे आमदार, मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत आमदारांनी अनुभव कथन करताना अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर शासकीय यंत्रणेने तत्काळ दखल घेऊन सदरचे प्रश्न व समस्या सोडविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. याची सारी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र आमदारांच्या या दौऱ्याला महिना उलटत असताना यातील एकाही आश्वासनाची पूर्तता होऊ शकलेली नाही.