शिवसेना नेतृत्वावर लावले प्रश्नचिन्ह!
By Admin | Updated: November 24, 2014 03:09 IST2014-11-24T03:09:11+5:302014-11-24T03:09:11+5:30
पक्षात फूट पडू नये यासाठीच सत्तेत जाण्याचा विचार शिवसेना नेतृत्व करीत असून, पक्ष टिकविण्याची क्षमता त्यांच्यात राहिलेली नाही

शिवसेना नेतृत्वावर लावले प्रश्नचिन्ह!
कणकवली : पक्षात फूट पडू नये यासाठीच सत्तेत जाण्याचा विचार शिवसेना नेतृत्व करीत असून, पक्ष टिकविण्याची क्षमता त्यांच्यात राहिलेली नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. शिवसेना मराठीच्या मुद्द्यासाठी तसेच हिंदुत्वासाठी नाही, तर ‘मातोश्री’च्या तसेच मूठभर आमदार, खासदारांच्या दरनिर्वाहासाठी आता उरली आहे, असे ते म्हणाले.
येथील ओमगणेश निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेला कोकणातील जनतेने ताकद दिली, असे सांगणाऱ्या शिवसेना नेत्यांनी नेहमीच कोकणी माणसाची फसवणूक केली आहे. सत्तेसाठी स्वत: लाचार असलेले दुसऱ्याला काहीही देऊ शकणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमान शिकविला. मात्र, आताच्या शिवसेनेच्या नेतृत्वात हा स्वाभिमान राहिलेला नाही. लाचारी रक्तात असेल तर ती बाहेरही दिसतेच. विरोधी पक्ष म्हणून सत्तेबाहेर बसायचे एवढे धाडस शिवसेना नेतृत्वात राहिलेले नाही, असे सांगून राणे म्हणाले, जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम राहील, असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंमध्ये या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठणकावण्याची ताकद नाही.
जैतापूर प्रकल्पाचे काम सुरू असून, ते पूर्ण होणारच आहे. त्यामुळे यांच्या विरोधाला कोण विचारतो, अशी स्थिती आहे. (वार्ताहर)