शिवसेना-भाजपात मानापमान नाट्य

By Admin | Updated: June 9, 2016 06:05 IST2016-06-09T06:05:55+5:302016-06-09T06:05:55+5:30

शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईची झलक बुधवारी वांद्रे टर्मिनस येथील रेल्वेच्या कार्यक्रमात पाहण्यास मिळाली.

Shivsena-BJP Manapham plays | शिवसेना-भाजपात मानापमान नाट्य

शिवसेना-भाजपात मानापमान नाट्य


मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईची झलक बुधवारी वांद्रे टर्मिनस येथील रेल्वेच्या कार्यक्रमात पाहण्यास मिळाली. रेल्वे प्रशासनाकडून शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना गृहित धरले जाते आणि आयत्यावेळी निमंत्रण दिले जाते असा आरोप करत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांसह निदर्शने आणि घोषणाबाजी केली.
वांद्रे टर्मिनस येथील नविन होम प्लॅटफॉर्म तसेच बुकिंग कार्यालय, कांदिवली स्थानकात एक सरकता जिना व बुकिंग कार्यालय आणि गोरेगाव स्थानकात सरकत्या जिन्यांचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नवी दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे करण्यात आले. त्यावेळी हा प्रकार घडला. घोषणाबाजीमुळे रेल्वेला कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.
कांदिवली येथे सरकता जिना व बुकिंग कार्यालयाचे उद्घाटन करताना स्थानकात भाजपाचे खासदार गोपाळ शट्टी, आमदार योगेश सागर आणि अतुल भातखळकर उपस्थित होते. तर वांद्रे येथील सुविधांचे उद्घाटन करताना टर्मिनसवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे यांच्याह भाजपचे आमदार आशीष शेलार आणि पश्चिम व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी.अग्रवाल उपस्थित होते.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गळ्यात काळे उपरणे घालतच प्रवेश केला. सावंत आणि विचारे यांनी व्यासपिठावर न जाता खाली असलेल्या खुर्च्यांतच बसणे पसंत केले. त्यांना भाषणासाठी बोलाविण्यात आले. मात्र दोघेही खुर्चीतच ठाण मांडून बसले. यावेळी उपस्थित असलेले शिवसेना कार्यकर्ते घोषणाबाजीच्या तयारी होते. दिल्लीतून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे भाषण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे भाषण सुरू झाल्यानंतर सेना कार्यकर्र्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून रेल्वेमंत्र्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण पश्चिम रेल्वेला बंद करावे लागले.
२५ स्थानकांवर मातांसाठी चिल्ड्रन मेनू देण्याच्या ‘जननी सेवा’ योजने सह अनेक योजनांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र शिवसेनेचा विरोध आणि पवित्रा पाहता पश्चिम रेल्वेने भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशीष शेलार यांना बोलावून त्वरीत वांद्रे टर्मिनसवरील होम प्लॅटफॉर्म, बुकींग कार्यालयाचे उद्घाटन उरकून घेतले. (प्रतिनिधी)
गोरेगाव स्टेशन तीन सरकत्या जिन्यांचे उद्घाटन करण्यात आले. जवळपास १ कोटी ६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
वांद्रे टर्मिनसवर एका नविन होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कामासाठी एकूण ३३ कोटी रुपये खर्च तर बुकिंग कार्यालयासाठी १ कोटी ५ लाखांचा खर्च आला.
कांदिवली स्थानकात दक्षिण दिशेला एलिव्हेटेड (उन्नत) बुकींग कार्यालय बनविण्यात आले आहे.
आम्हाला नेहमी आयत्यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाते. याआधीच्या कार्यक्रमात रेल्वेमंत्र्यांकडे लेखी तक्रारही केली होती. तरीही या कार्यक्रमाचेही निमंत्रण उशिरा पाठविण्यात आले.
- अरविंद सावंत, खासदार
रेल्वेने आम्हाला नाही बोलावले तरी चालेल. मात्र आमचा अशाप्रकारे अपमान करू नये. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत.
- राजन विचारे, खासदार
लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला गेला पाहिजे. हा प्रकार टाळता आला असता.
- आशिष शेलार, आमदार

Web Title: Shivsena-BJP Manapham plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.