शिवस्मारकाला मुहूर्त मिळाला
By Admin | Updated: December 16, 2014 03:28 IST2014-12-16T03:28:17+5:302014-12-16T03:28:17+5:30
बईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकारचे भूमिपूजन येत्या १९ फेब्रुवारीला करण्यात येईल,

शिवस्मारकाला मुहूर्त मिळाला
नागपूर : मुंबईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकारचे भूमिपूजन येत्या १९ फेब्रुवारीला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या या शिवस्मारकाबाबत आपल्या सरकारने या स्मारकासाठी अत्यंत आवश्यक असलेली केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी एक महिन्याच्या आत मिळविली आहे. आधीच्या सरकारने या स्मारकाचा अतिशय चांगला आराखडा तयार केलेला आहे, अशी पुस्तीही फडणवीस यांनी जोडली.
सीमाभाग मिळालाच पाहिजे
कर्नाटकातील सीमाभाग महाराष्ट्राचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला लढण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील, असे ते म्हणाले. सीमाभाग हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी बांधवांच्या अस्तित्वाचा विषय असल्याचे ते म्हणाले.
अभिभाषणाबद्दल राज्यपालांचे अभिनंदन करणारा ठराव मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मंजूर करण्यात आला.
डॉ. आंबेडकर स्मारक उभारण्याचा निर्धार
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी केंद्र सरकारने या स्मारकाबाबत काही मुद्द्यांवर राज्य शासनाकडून हमीपत्र मागितले होते. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांना वेळ मिळाला नसेल, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. ते म्हणाले की, १७ नोव्हेंबरला आपल्या सरकारने हे हमीपत्र पाठविले आहे.
दाभोळ वीज प्रकल्प बंद होणार नाही
दाभोळ वीज प्रकल्पात बँकांचे मोठ्या प्रमाणात पैसे गुंतलेले आहेत. हा प्रकल्प बंद होणे मोठ्या आर्थिक नुकसानीस कारण ठरेल. या प्रकल्पात केंद्र सरकारने मोठा वाटा उचलावा, राज्य सरकार काही नुकसान सहन करेल.
प्रकल्पातून निर्माण होणारी वीज सेंट्रल ग्रीडमध्ये जाईल. तेथून नियमानुसार राज्याला आपला
हिस्सा मिळेल, अशा पद्धतीची बोलणी चालू असल्याचे मुख्यमंत्री
म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)