शिवसैनिक आत घुसले होते, पण पक्षप्रमुखांचा आदेश आला नाही
By Admin | Updated: October 13, 2015 11:40 IST2015-10-13T11:31:38+5:302015-10-13T11:40:32+5:30
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री यांचा पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी सहा शिवसेना कार्यकर्ते सभागृहात घुसले होते अशी माहिती समोर आली आहे.
शिवसैनिक आत घुसले होते, पण पक्षप्रमुखांचा आदेश आला नाही
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री यांचा पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी सहा शिवसेना कार्यकर्ते सभागृहात घुसलेही होते मात्र पक्षप्रमुखांचा आदेश न आल्याने या शिवसैनिकांनी कार्यक्रम उधळून लावला नाही अशी माहिती समोर आली आहे.
सोमवारी वरळीत कडेकोट पोलिस बंदोबस्तात माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेने दिला असला तरी पोलिसांमुळे सेनेचा हा प्रयत्न फसल्याचे सांगितले जात होते. मात्र मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार सहा शिवसैनिक पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून कार्यक्रम उधळून लावण्यासाठी सभागृहात उपस्थित होते. या सर्वांकडे काळे रुमालही होते. कार्यक्रम सुरु असताना पक्षप्रमुखांकडून आदेश येताच काळे रुमाल दाखवत कार्यक्रम उधळून लावण्याचे ठरले होते. मात्र पक्षप्रमुखांकडून फोन न आल्याने शिवसैनिकांनी माघार घेतली. शिवसेनेचे शिवडीतील आमदार अजय चौधरी यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या कार्यक्रमाची प्रवेश पत्रिका कशी मिळवली याबाबत त्यांनी उत्तर दिलेले नाही. या शिवसैनिकांकडे संशयास्पद असे काहीच नसल्याने त्यांना सभागृहात सहज प्रवेश मिळाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. तर पोलिसांनी मात्र या विषयी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.