शिवरायांना मुस्लिम सरदारांचा मानाचा मुजरा
By Admin | Updated: February 19, 2015 23:41 IST2015-02-19T23:20:31+5:302015-02-19T23:41:24+5:30
शिवजयंती उत्साहात : सांगली, मिरजेत शिवप्रतिमेची मिरवणूक, कार्यक्रमांमधून एकात्मतेचा संदेश

शिवरायांना मुस्लिम सरदारांचा मानाचा मुजरा
सांगली : छत्रपती शिवरायांच्या सैन्यात असणाऱ्या निष्ठावंत मुस्लिम सैनिकांच्या वेशभूषा करून उंट, घोड्यांवर स्वार होऊन मुस्लिम बांधवांनी आज, गुरुवारी सांगली शहरातील प्रमुख मार्गावरुन वाजत-गाजत मिरवणूक काढली आणि शिवरायांना मुस्लिम सरदारांतर्फे मानाचा मुजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त मुस्लिम समाजातर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यासही चांगला प्रतिसाद मिळाला.
शिवरायांच्या सैन्यात असणाऱ्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांचा इतिहास समाजासमोर यावा, या उद्देशाने प्रतिवर्षी मुस्लिम समाजातर्फे मिरवणूक काढण्यात येते. स्टेशन चौकातून दुपारी तीन वाजता स्थायी समिती सभापती संजय मेंढे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश गायकवाड यांच्याहस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
स्टेशन चौकातून मिरवणूक राजवाडा चौक, पटेल चौक, झाशी चौक, हरभट रोड मार्गे मारुती चौकात आली. तेथे शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बसस्थानक रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तेथून बापट बाल प्रशाला, फौजदार गल्ली, हिराबाग कॉर्नर, बदाम चौक, नळभाग, राममंदिर मार्गे डॉ. आंबेडकर क्रीडांगणावर येऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
मिरज : मिरजेत पुरोगामी संघटनांतर्फे गुरुवारी शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवरायांच्या सरदारांच्या वेशात मुस्लिम बांधव सहभागी होते. शहरातील प्रमुख मार्गावरून शिवाजी चौकात मिरवणुकीचा समारोप झाला.
आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी आमदार हाफिज धत्तुरे, शिवराज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास देसाई, दस्तगीर मलिदवाले, पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हायस्कूल रोड येथून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अभिजित पवार यांच्याहस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत दर्या सारंग, इब्राहिम खान, काझी हैदर, सिध्दी इब्राहिम, नूरखान बेग, दौलतखान, मदारी मेहतर, बाबा याकूब, शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांच्या वेशात घोडेस्वार, मावळे, बैलगाड्या, रिक्षा सहभागी होत्या.
शिवछत्रपतींचा जयघोष करीत मिरवणुकीत रमेश पवार, डॉ. मन्नान शेख, महादेव कोरे, असगर शरीकमसलत, माजी आमदार शरद पाटील, डॉ. महेश कांबळे, जहिर मुजावर, डॉ. केशव नकाते, अमृतराव सूर्यवंशी, संभाजी मेंढे, प्रकाश इनामदार, बाळासाहेब पाटील, धनंजय भिसे, जैलाब शेख, दिगंबर जाधव, शकील पटेल, मुस्तफा बुजरूक, सुलेमान मुजावर, शकील काझी, सजिद पठाण, महेबूब मुश्रीफ,गौतम काटकर, महेबूब मणेर आदी मिरवणुकीत सहभागी होते. शिवजयंती उत्सव समितीने संयोजन केले.
छावा युवा संघटनेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. सुभाषनगर येथे अंगणवाडी क्रमांक ११४ येथे विद्यार्थी, पालक, संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांतर्फे संजय चौगुले यांच्याहस्ते शिवप्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर, बाळासाहेब सूर्यवंशी, माजी सभापती भारत कुंडले, बाळासाहेब माळी, अनिल साळुंख, अनिता कदम उपस्थित होते. यावेळी शिवछत्रपतींचा इतिहास या छोट्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. दलित महासंघातर्फे अध्यक्ष डॉ. प्रशांत लोखंडे यांनी पुतळ्यास अभिवादन केले. (प्रतिनिधी)
सांगलीत सामूहिक विवाह सोहळा
सांगलीच्या आझाद व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बैजू अशोक वाघमारे (मिरज) आणि कोमल रामचंद्र जाधव (मिरज) यांचा ख्रिश्चन पध्दतीने, तर बाबासाहेब माणिक फाळके (सांगली) आणि नीता अशोक कांबळे (सांगली) यांचा शिवधर्म पध्दतीने विवाह लावण्यात आला. या वधू-वरांना मुस्लिम समाजातर्फे एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, चांदीची अंगठी, संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. यावेळी असिफ बावा, उमर गवंडी, समीना खान, शहानवाज फकीर, सलीम बारगीर, रज्जाक नाईक, हारुण शिकलगार, आयुब पटेल, मुश्ताक रंगरेज, अॅड. रियाज जमादार, जब्बार बावस्कर, सुनील गवळी, बाबूभाई तांबोळी, शाहीन शेख आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
मिरवणुकीने वेधले सांगलीकरांचे लक्ष
मिरवणुकीत ‘आम्ही शिवबाचे सरदार’ हा पोवाडा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचप्रमाणे मैदानी खेळांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी मारुती चौकात नागरिकांनी गर्दी केली होती.
चौका-चौकात मैदानी खेळांची प्रात्यक्षिके दाखविली जात होती. यामध्ये दांडपट्टा, तलवारीने लिंबू कापणे आदी खेळप्रकारांचा समावेश होता.
मुस्लिम बांधवांनी सरदारांचा वेश परिधान केला होता. यामध्ये मदारी मेहतर, दर्या सारंग, सिध्दी मेतकरी, सिध्दी वाहवा, रुस्तूम ए जमाल, रुस्तूम ए खान आदी सरदारांचा समावेश होता.
घोडे, तसेच उंटावर स्वार झालेले सरदार पाहण्यासाठी सांगलीकरांनी गर्दी केली होती. यावेळी बेंजो पथकावर देशभक्तीपर गीते सुरू होती.