खोदकामात सापडली शिवलिंगे

By Admin | Updated: September 10, 2016 03:16 IST2016-09-10T03:16:13+5:302016-09-10T03:16:13+5:30

शहरातील साई झुलेलाल मंदिरासमोरील रस्त्याचे खोदकाम सुरू असतांना मजुरांना दोन शिवलिंग सापडली.

Shivalinga found in khodakam | खोदकामात सापडली शिवलिंगे

खोदकामात सापडली शिवलिंगे


उल्हासनगर : शहरातील साई झुलेलाल मंदिरासमोरील रस्त्याचे खोदकाम सुरू असतांना मजुरांना दोन शिवलिंग सापडली. स्थानिक नागरिक आणि मंदिराच्या ट्रस्टींच्या म्हणण्यानुसार सापडलेले शिवलिंग प्राचीन असून त्याजागी पूर्वी गोशाळा असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांसह महिलांनी पुजेसाठी एकच गर्दी केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात साई झुलेलाल मंदिर आहे. मंदिरासमोरील रस्त्याच्या जागेवरून ट्रस्टी व नागरिकांत वाद झाला होता. अखेर नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पालिकेने पुढाकार घेवून रस्त्याचे काम सुरू केले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रस्ता खोदतांना एका मजुराला दोन गुळगुळीत लांबट दगड दिसले. त्याने हळूच ते वर काढले. नीट पाहिल्यावर ते शिवलिंग असल्याचे लक्षात आले. त्याची माहिती मंदिराच्या ट्रस्टींसह नागरिकांना मिळताच त्यांनी एकच गर्दी करून पुजा-अर्चा सुरू केली. खोदकामात निघालेले शिवलिंग अन्यत्र न हलविता तेथेच त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचा आग्रह नागरिकांनी धरला.
स्थानिक नगरसेवक जया माखिजा तसेच भाजपाचे पदाधिकारी प्रकाश माखिजा, समाजसेवक प्रकाश तलरेजा, दीपक रोहरा यांच्यासह मंदिराचे प्रमुख साई लीलाराम मुलचंदानी यांनी शिवलिंग प्राचीन असल्याचा दावा केला. शासन स्तरावर त्याला अद्यापही दुजोरा मिळालेला नाही. आयुक्त मनोहर हिरे, पोलीस उपायुक्त सुनील भारद्बाज यांनी सापडलेल्या प्राचीन शिवलिंगाची माहिती घेणार असल्याचे सांगितले.
मंदिर परिसरात नागरिकांसह महिलांनी त्या लिंगाच्या पुजेसाठी एकच गर्दी केली. ‘चालिया साहेब’ समाप्तीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने श्रद्धाळूंत आनंदाची लहर पसरली. (प्रतिनिधी)

Web Title: Shivalinga found in khodakam