पानसरेंच्या नावाचे शिवाजी विद्यापीठाला वावडे
By Admin | Updated: July 21, 2015 01:36 IST2015-07-21T01:36:51+5:302015-07-21T01:36:51+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागावा, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून

पानसरेंच्या नावाचे शिवाजी विद्यापीठाला वावडे
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागावा, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून शिवाजी विद्यापीठ परिसरातून काढण्यात येणाऱ्या ‘मॉर्निंग वॉक’मुळे विद्यापीठाची बदनामी होते, अशी हरकत विद्यापीठाच्या काही अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी सुरक्षा रक्षकांना पुढे करून हा ‘मॉर्निंग वॉक’ रोखण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारामुळे सकाळी एनसीसी भवन येथील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर तणाव निर्माण झाला.
पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले. त्या दिवसाची स्मृती कायम राहावी व मारेकऱ्यांचा शोध लागावा, या उद्देशाने दर महिन्याच्या २० तारखेला सकाळी साडेसहा वाजता पानसरे यांच्यावर जिथे हल्ला झाला, त्या ठिकाणाहून हा ‘मॉर्निंग वॉक’ काढला जातो. कोणतीही घोषणाबाजी नाही, की निदर्शने नाहीत, अगदी शांतपणे या ‘मॉर्निंग वॉक’चे आयोजन केले जाते. माध्यमांतून ‘शिवाजी विद्यापीठातून मॉर्निंग वॉक काढण्यात आला,’ असा उल्लेख आल्याने विद्यापीठांची बदनामी होते. फेरी काढा परंतु त्यावेळी फलक नकोत व त्याच्या वृत्तपत्रांत बातम्या येताना विद्यापीठाचा उल्लेख येऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते.
सोमवारी सकाळी सात वाजता पानसरे यांच्या घरापासून या ‘मॉर्निंग वॉक’ला सुरुवात झाली. शिवाजी विद्यापाठातील एनसीसी भवनजवळील प्रवेशद्वाराजवळ मॉर्निंग वॉकमधील नागरिकांना सुरक्षा रक्षकांनी रोखून धरले. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी परवानगी घेतली आहे का?, हातामधील फलक बाजूला ठेवा, अशी विनंती सुरक्षा रक्षकांनी केली. दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांनी पुढे येऊन कसली परवानगी, कोणते फलक बाजूला ठेवा, अशी विचारणा करत, आम्ही काही आंदोलनासाठी आलेलो नाही, आम्ही शांतपणे मॉर्निंग वॉक काढत आहे. सर्व विचारांचे लोक यामध्ये सहभागी आहेत. अकारण कोणत्या गोष्टीला विरोध करू नका, अशी ठाम भूमिका घेतली. (प्रतिनिधी)