जयंत जाधव यांच्याऐवजी शिवाजी सहाणे आमदार
By Admin | Updated: January 14, 2015 04:40 IST2015-01-14T04:40:50+5:302015-01-14T04:40:50+5:30
२५ मे २०१२ रोजी झालेल्या या निवडणुकीत जाधव व सहाणे या दोघांनाही प्रत्येकी २२१ अशी समसमान मते मिळाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय

जयंत जाधव यांच्याऐवजी शिवाजी सहाणे आमदार
मुंबई : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंतराव पुंडलिकराव जाधव यांची अडीच वर्षांपूर्वी विधान परिषदेवर झालेली निवड मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली आणि त्या निवडणुकीत जाधव यांच्याऐवजी शिवसेनेचे शिवाजी लक्ष्मण सहाणे विजयी झाल्याचे घोषित केले.
२५ मे २०१२ रोजी झालेल्या या निवडणुकीत जाधव व सहाणे या दोघांनाही प्रत्येकी २२१ अशी समसमान मते मिळाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी पेरियास्वामी वेल्लारसू यांनी चिठ्ठी पद्धतीने कौल देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार जयंत जाधव विजयी झाल्याचे जाहीर केले होते. सहाणे यांनी याविरुद्ध उच्च न्यायालयात निवडणूक याचिका केली होती. न्या. राजेश केतकर यांनी या याचिकेवर मंगळवारी अंतिम निकाल दिला व जाधव यांची निवड रद्द करून त्यांच्याएवजी सहाणे विजयी झाल्याचे घोषित केले.
निकाल जाहीर केल्यानंतर जाधव यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी त्यास स्थगिती देण्याची विनंती केली. ती मान्य करून न्या. केतकर यांनी आपल्या निकालाचा अंमल आठ आठवड्यांसाठी स्थगित केला. मात्र या स्थगितीच्या काळात जाधव आमदार निधीचा विनियोग करू शकणार नाहीत, अशी अट घालण्यात आली. परिणामी जाधव यांची आमदारकी तूर्तास तरी दोन महिन्यांसाठी वाचली आहे.
या काळात त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली नाही तर त्यांच्याजागी सहाणे विधान परिषद सदस्य होतील व त्यांना मे २०१८पर्यंतचा कार्यकाळ मिळेल.
या सुनावणीत सहाणे यांच्यासाठी ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांच्यासह अॅड. शीशैल देशमुख व अॅड. प्रवीण गोळे यांनी, जाधव यांच्यासाठी ज्येष्ठ वकील सी. एम. कोर्डे व अॅड. भूषण महाडिक यांनी तर निवडणूक आयोगासाठी अॅड. रेखा राजगोपाल यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)