मंत्रिपदी शिवाजीराव नाईक की सदाभाऊ?

By Admin | Updated: November 11, 2015 00:14 IST2015-11-10T22:19:12+5:302015-11-11T00:14:14+5:30

जिल्ह्याला लाल दिवा शक्य : बिहारच्या निकालाचा भाजपवर परिणाम

Shivaji Rao Naik's Sadbhau? | मंत्रिपदी शिवाजीराव नाईक की सदाभाऊ?

मंत्रिपदी शिवाजीराव नाईक की सदाभाऊ?

अशोक पाटील -- इस्लामपूर -बिहारच्या निकालाचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर होऊ नये म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीला मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सोमवारी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आता मंत्रिपदाची लॉटरी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना लागणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने भाजप सावध झाला आहे. जिल्ह्यात शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आणि विलासराव जगताप हे भाजपचे आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. नाईक यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या प्रचारसभेत कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असा शब्द दिला होता. याला वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी नाईक यांच्या पदरात पद पडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना भाजपची कोअर कमिटी आतही येऊ देत नसल्याने या दोघांनीही आता उसाच्या एफआरपीसाठी लढा सुरू केला आहे.
आघाडी शासनाच्या काळात सांगली जिल्ह्यात तीन मंत्रिपदे होती. मात्र युती शासनाने गेल्या वर्षभरात सांगलीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. पण आता बिहारमधील पराभवाचे पडसाद दक्षिण महाराष्ट्रावर पडू नयेत, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फटका बसू नये म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या चार आमदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिपदाचे वेध लागले आहे. मात्र शिवाजीराव नाईक आणि सदाभाऊ खोत हेच प्रबळ दावेदार मानले जातात.

Web Title: Shivaji Rao Naik's Sadbhau?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.