शिवभक्त आज रायगडला जाणार

By Admin | Updated: June 3, 2015 23:40 IST2015-06-03T22:15:43+5:302015-06-03T23:40:40+5:30

कोल्हापुरातून तुकडी रवाना : ऐतिहासिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार सोहळा

Shiva Bhakta going to Raigad today | शिवभक्त आज रायगडला जाणार

शिवभक्त आज रायगडला जाणार

कोल्हापूर : ऐतिहासिक, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि हजारो शिवभक्तांच्या साक्षीने रायगडावर युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उद्या, शुक्रवारी व शनिवारी (दि. ६) रंगणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने हा सोहळा आयोजित केला आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे ३० हजार शिवभक्त आज, गुरुवारी रात्री दहा वाजता भवानी मंडपातून रवाना होतील. सोहळ्यासाठी समितीकडे २३ हजार शिवभक्तांनी नोंदणी केली आहे. अन्नछत्र, मर्दानी क्रीडापथकाची दोनशे जणांची तुकडी बुधवारी सायंकाळी पाच वाजता रवाना झाली.शिवभक्तांची नोंदणी, कार्यक्रम आणि गडावरील सजावट, आदींचे नियोजन अशा पद्धतीने समितीने तयारी पूर्ण केली आहे. गडावरील पूर्वतयारीसाठी समितीचे अध्यक्ष सागर यादव आणि हेमंत साळोखे यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्राचे साहित्य घेऊन
दोनशे जणांचे पथक बुधवारी सायंकाळी पाच वाजता भवानी मंडपातून रवाना झाले. त्यासह देशभरातून विविध ठिकाणांहून सुमारे एक हजार शिवप्रेमी रायगडाच्या दिशेने निघाले. सोहळ्याची सुरुवात उद्या, शुक्रवारी दुपारी चार वाजता रायगड येथे युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते रायगडाच्या पायथ्यापासून गडचढाई करतील. त्यांच्यासमवेत गडावर चालत येण्याचा मान शिवभक्तांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)

सोहळ्याचे आकर्षण
सोहळ्यात राज्यातील अनेक शिवकालीन युद्धकलाविशारद
आपली प्रात्यक्षिके रणहलगी, रणशिंगांच्या निनादात सादर
करणार आहेत. त्यासह भव्य पालखी सोहळा, छत्रचामरांसह शिवरायांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात येणार आहे, असे समितीचे अध्यक्ष यादव यांनी सांगितले. ते म्हणाले, शाहिरी, सांस्कृतिक, ऐतिहासिक कार्यक्रमांनी सोहळा रंगणार आहे. पुणे, मुंबईतील ढोलताशा पथकांच्या वादनाने सोहळ्याचा समारोप होईल.


रायगडावर होणारे भरगच्च कार्यक्रम
शुक्रवार :
शाहिरी कार्यक्रम (राजसदर) : सायंकाळी ५.३० वा.
सांस्कृतिक कार्यक्रम : ६.३० वा.
शिवछत्रपतींच्या जीवनावरील विविध पुस्तकांचे प्रकाशन : ७ वा.
अन्नछत्राचे उद्घाटन : रात्री ८ वा.
शिरकाईदेवी, तुळजाभवानी देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम : ८.३० वा. रात्र शाहिरांची कार्यक्रम : ९ वा.
शनिवार :
नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर ध्वजारोहण : पहाटे ५.३० वाजता.
राजसदरेवरील कार्यक्रम : सकाळी ६ वा.
शाहिरी मुजऱ्याचा कार्यक्रम : ८ वा.
युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे आगमन : ९. ३० वा.
शिवरायांच्या उत्सवमूर्तीवर राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारांत अभिषेक : १०. वा.
शिवरायांच्या मूर्तीस सुवर्णनाण्यांचा अभिषेक : सकाळी १०.२० वाजता.
पालखी मिरवणूक : १०.३० वा.
कार्यक्रमाची सांगता : ११ वा.
ढोलताशा वादन : दुपारी १२ वा.

Web Title: Shiva Bhakta going to Raigad today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.