शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याची बँक अधिकाऱ्याला मारहाण
By Admin | Updated: June 15, 2016 20:06 IST2016-06-15T20:06:11+5:302016-06-15T20:06:11+5:30
पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची मागणी करणाऱ्या आर्णी सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या जि. प. सदस्याने बँक व्यवस्थापकाच्या कक्षातच मारहाण केल्याची आज घडली

शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याची बँक अधिकाऱ्याला मारहाण
आर्णीची घटना : पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक
आर्णी (यवतमाळ ) : पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची मागणी करणाऱ्या आर्णी सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याने बँक व्यवस्थापकाच्या कक्षातच मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून वृत्तलिहेस्तोवर पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती.
आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आर्णी सेंट्रल बँकेचा व्यवसाय प्रतिनिधी राजू पाटील (रा. सावळी सदोबा) हा पैशाची मागणी करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यावरून बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास प्रवीण शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख रवी राठोड व काही शिवसैनिक सेंट्रल बँकेच्या शाखेत गेले. त्या ठिकाणी व्यवस्थापकाला माहिती विचारली. त्यावेळी राजू पाटील याला कक्षात बोलाविण्यात आले. त्या ठिकाणी वाद होऊन प्रवीण शिंदे व रवी राठोड या दोघांनी बँक व्यवस्थापकाच्या समोरच राजू पाटील याला बेदम मारहाण केली. या प्रकाराने व्यवस्थापक गोंधळून गेले. वृत्तलिहेस्तोवर त्यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती.
दरम्यान बँक व्यवस्थापक सतीश पाथ्रडकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण येथे मे महिन्यापासून प्रभारी व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहोत. राजू पाटील हा आमच्या बँकेचा व्यवसाय प्रतिनिधी असून तो पीक विम्याचे काम बघतो. कोणत्याही शेतकऱ्याने आपल्याकडे राजू पाटील पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार दिली नाही असे त्यांनी सांगितले. बँकेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करून नंतर पोलिसात तक्रार दिली जाईल.
तर जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता सेंट्रल बँकेकडून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पैसे मागत असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे दिली आहे. त्यातीलच काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. या संबंधी माहिती घेण्यासाठी बँकेत गेलो असता राजू पाटील याने अपमानस्पद वागणूक दिली. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.