पाकविरोधी भूमिकेला शिवसेनेची मुरड
By Admin | Updated: May 26, 2014 03:08 IST2014-05-26T03:08:46+5:302014-05-26T03:08:46+5:30
नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसह सर्व सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण धाडले.

पाकविरोधी भूमिकेला शिवसेनेची मुरड
मुंबई : नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसह सर्व सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण धाडले. नवाज शरीफ यांनी भारतभेटीचे निमंत्रण स्वीकारल्याने शिवसेनेसमोर मात्र पेच निर्माण झाला. पाकिस्तानसोबत कसलेच संबंध नको, अशी भूमिका घेत कलावंत, क्रिकेटपटूंना शिवसेनेने कायम विरोध केला. आता ‘एनडीए’ची सत्ता आल्यानंतर भूमिकेला मुरड घालून नवाज शरीफ यांचे स्वागत करायचे, त्यांच्यासमोरच मंत्रिपदाची शपथ घ्यायची की बहिष्काराचे अस्त्र उपसायचे यावरून शिवसेनेची कोंडी झाली. ही कोंडी फोडत सर्व खासदारांना नवी दिल्लीतील सोहळ्यास उपस्थित राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना दिल्या आहेत. आज सायंकाळी मातोश्री येथील झालेल्या चर्चेनंतर शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या कालखंडानंतर केंद्रात सत्तेवर येण्याची संधी मिळाली. अशावेळी विनाकारण वाद निर्माण न करण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)