दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची ‘जमवाजमव’!
By Admin | Updated: September 29, 2015 02:00 IST2015-09-29T02:00:45+5:302015-09-29T02:00:45+5:30
‘एक व्यक्ती, एक मैदान’ म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवाजी पार्क असे हे दसरा मेळाव्याचे दृढ समीकरण होते.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची ‘जमवाजमव’!
मुंबई : ‘एक व्यक्ती, एक मैदान’ म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवाजी पार्क असे हे दसरा मेळाव्याचे दृढ समीकरण होते. लोक उत्स्फूर्तपणे या मेळाव्यास हजेरी लावत असत. मात्र यंदा दसरा मेळाव्याकरिता गर्दी जमवण्याचे नियोजन करण्याकरिता चक्क सोमवारी शिवसेना भवनात बैठक घ्यावी लागली.
कोल्हापूर व कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक आणि शिवसेनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, हे औचित्य साधून यंदाच्या दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी जून महिन्यात षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमावर मुसळधार पावसाने पाणी फेरले होते. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने गर्दी जमवण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी शिवसेना भवनात सोमवारी एका बैठकीचे आजोजन करण्यात आले होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला मार्गदर्शन करावे, अशी योजना होती. मात्र अशा बैठकीस उद्धव यांनी उपस्थित राहाणे उचित दिसणार नाही, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम व खासदार संजय राऊत यांनी सूचित केल्याने उद्धव यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. उद्योगमंत्री सुभाष देसाई व खासदार अनिल देसाई यांनी बैठकीत जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार, अशी विचारणा पदाधिकाऱ्यांनी केली असता मेळाव्याचे ठिकाण ठरलेले नाही. मात्र सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने मेळावा शिवाजी पार्कमध्येच व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)