विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा
By Admin | Updated: November 10, 2014 18:14 IST2014-11-10T17:59:27+5:302014-11-10T18:14:26+5:30
विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला असून एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी असे पत्र शिवसेनेने विधानसभा सचिवांना दिले आहे.

विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला असून एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी असे पत्र शिवसेनेने विधानसभा सचिवांना दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसविषयी भाजपाने त्यांच भूमिका जाहीर करावी, अन्यथा आम्ही विरोधी बाकावर बसू अशी अट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासमोर ठेवली होती. मात्र सोमवारपासून सुरु झालेल्या विधी मंडळाच्या विशेष अधिवेशनात शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष उघडपणे दिसून आला. शिवसेनेने विरोधी बाकांवर बसून भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले. तसेच मराठी शाळांमध्ये उर्दूचे शिक्षण देण्यावरुनही शिवसेना आमदारांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना 'हिरवी टोपी' भेट देऊन निषेध दर्शवला होता.
संध्याकाळी शिवसेनेच्यावतीने विधानसभा सचिवांना पत्र दिले. ६३ जागांवर विजय मिळवून शिवसेना विधानसभेत दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. याआधारे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदावर निवड करावी अशी मागणी आम्ही विधानसभा सचिवांना केल्याचे शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी सांगितले.
बुधवारी भाजपा सरकारला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा द्यायची आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी भाजपाला शिवसेनेचा पाठिंबा आवश्यक होता. आता शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याने भाजपाला राष्ट्रवादीची गरज भासणार असे दिसते.