- यदु जोशीमुंबई : ‘आदित्यला सांभाळा’ असे भावनिक आवाहन करीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १० ऑक्टोबर २०१० रोजी दसरा मेळाव्यात नातू आदित्य यांना राजकारणात आणले. त्याच्या सव्वातीन वर्षे आधी राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्याने ठाकरे घराण्यातील फूट उघड झाली होती. पुढील काळात उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. आता आदित्यनंतर सव्वानऊ वर्षांनी राजकारणात उतरलेले राज यांचे पुत्र अमित यांची तुलना आदित्य यांच्याशी होईलच. अर्थात, राजकीय वाटचालीत आदित्य हे बरेच पुढे आहेत.बाळासाहेबांच्या आशीर्वादाने व वडील उद्धव यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले असताना आदित्य राजकारणात आले. त्यांचा प्रवेश हा सुकर होता आणि त्यांना भक्कम पाठबळ होते. लाखो शिवसैनिकांची फौज सोबत होतीच. मात्र, मनसेचा पूर्वीसारखा प्रभाव राहिलेला नसताना, राज यांच्या नेतृत्व व भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागलेले असताना म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीत अमित यांची राजकीय इनिंग सुरू झाली आहे. आदित्य यांच्या तुलनेने त्यांचा राजकीय प्रवास खडतर असेल. आदित्य हे मिळालेले नेतृत्व सिद्ध करीत आहेत, तर अमित यांना ते नेतृत्वासाठी सक्षम असल्याचे सिद्ध करायचे आहे.
दोघांमधील साम्य : नम्र स्वभाव, लोकसंग्रहाची आवड, राज्यापुढील प्रश्न जाणून घेण्याची इच्छा.शिवसेना असो की मनसे, दोघांसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असेल. दोन वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत आदित्य विरुद्ध अमित असा संघर्षही बघायला मिळू शकेल. त्यापूर्वी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत अमित यांना सक्रिय केले जाईल. काल त्यांनी नेतेपद स्वीकारल्यानंतर जाणवलेली बाब म्हणजे, अमित यांना भाषण, सभाधीटपणा याची तयारी करावी लागेल. त्याबाबत आदित्य पूर्ण तयार नसले तरी उजवे आहेत.संवादाचा दरवाजा उघडलाआदित्य हे वडिलांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. आधी मातोश्रीवर आणि आता मंत्रालयात थेट उद्धव ठाकरेंना भेटणे शक्य नसेल तर लोकांना आदित्य यांचा पर्याय असतो. राज यांच्याशी बोलताना आम्हाला बरेचदा दडपण येते, पण अमित यांच्याशी सहज बोलता येते. त्यामुळे संवादाचा दरवाजा आमच्यासाठी उपलब्ध झाला अशी प्रतिक्रिया मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाºयाने दिली.