....तर शिवसेना विरोधी बाकावर बसेल - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: November 9, 2014 20:06 IST2014-11-09T19:40:54+5:302014-11-09T20:06:30+5:30
भाजपाने भगवा दहशतवाद म्हणणा-या शरद पवारांची साथ घेतल्यास शिवसेना विरोधी बाकावर बसेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
....तर शिवसेना विरोधी बाकावर बसेल - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा घेणार की नाही हे स्पष्ट करावे, भगवा दहशतवाद म्हणणा-या शरद पवारांची भाजपाने साथ घेतल्यास शिवसेना विरोधी बाकावर बसेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी सत्तेत सहभागी होणार की नाही याविषयी उद्धव ठाकरेंचे तळ्यात मळ्यात सुरु असल्याचे चित्र दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सहभागी होण्यास नकार देत शिवसेेनेने भाजपाला त्यांचा 'स्वाभिमान' दाखवून दिला होता. त्यामुळे राज्यातही शिवसेना विरोधी बाकावर बसेल का याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. लाचारी पत्कारुन आम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे नाही , राज्याचे चित्र स्पष्ट होईपर्यंत केंद्रातील मंत्रिमंडळात सहभागी होण्यात आम्हाला रस नव्हता त्यामुळे मी अनिल देसाईंना दिल्ली विमानतळावरुन परतायला सांगितले असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा भगवा दहशतवाद हा शब्द वापरला होता. तसेच वाजपेयी सरकार अवघ्या १३ दिवसांमध्ये पाडण्यात शरद पवारांचाच हात होता, या पवारांची भाजपा साथ घेणार का हे त्यांनी स्पष्ट करावे असा खोचक सवाल त्यांनी भाजपाला विचारला.
आम्हाला मंत्रिपदाची आस नसून जनतेशी प्रतारणा करणार नाही असे सांगत हिंदूत्ववादी पक्षांनी एकत्र राहावे हीच आमची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्या गटनेता त्यांच्या पदाची जबाबदारी स्वीकारतील, परवा विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार असून विधानसभा अध्यक्षपदासाठी कदाचित आमचा उमेदवारही रिंगणात असेल असे सूचक विधान त्यांनी केले. भाजपाने भूमिका जाहीर केली नाही तर आम्ही विश्वासदर्शक ठरावात त्यांच्याविरोधात मतदान करु असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला ४८ तासांचे अल्टिमेटमच दिले. तसेच केंद्राविषयी मात्र रविवारी सकाळी स्वाभिमानाची भाषा करणा-या शिवसेनेने पुन्हा एकदा ठोस भूमिका घेण्याचे टाळले आहे. केंद्रातील सत्तेतून बाहेर पडणार का हेदेखील आगामी दोन दिवसांत स्पष्ट होईल असे ठाकरेंनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे विधीमंडळातील शिवसेना गटनेते
ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी येथून निवडून येणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विधीमंडळातील गटनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.