शिवसेना होणार सत्तेत सहभागी!
By Admin | Updated: November 2, 2014 02:19 IST2014-11-02T02:19:30+5:302014-11-02T02:19:30+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 15 दिवसांत होण्याची शक्यता असून, शिवसेनेला सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
शिवसेना होणार सत्तेत सहभागी!
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 15 दिवसांत होण्याची शक्यता असून, शिवसेनेला सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीचा बहिष्काराचा पवित्र मागे घेत भाजपा सरकारच्या शपथविधी समारंभाला हजेरी लावली होती. त्यामुळे शिवसेना सत्तेत सहभागी होण्याचे संकेत कालच मिळाले होते. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या बोलणी सुरू आहे.
खासदार अनिल देसाई हे समन्वयाच्या भूमिकेत आहेत, असे समजते. भाजपाने शिवसेनेला सहा मंत्रिपदे देऊ केली असली तरी शिवसेना 12 मंत्रिपदांवर अडून असल्याचे सूत्रंनी सांगितले.
केंद्रामध्ये एक मंत्रिपद वाढवून द्यावे आणि एक राज्यपाल पददेखील द्यावे, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे सूत्रंनी सांगितले. मात्र चर्चा केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असावी, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये रवींद्र वायकर, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, अजरुन खोतकर, संजय राठोड यांच्या नावांची चर्चा आहे. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेनेला सत्तेत कोणत्या अटी- शर्तीवर घ्यायचे याची चर्चा केंद्रीय पातळीवर चालू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.
प्रदेशाध्यक्षपद मराठवाडय़ाकडे !
मुख्यमंत्रिपद विदर्भाकडे असल्याने प्रदेशाध्यक्षपद मराठवाडय़ाला देण्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी चर्चा होती़ मात्र ते मंत्री झाल्याने हे पद मराठवाडय़ाला मिळण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांच्या नावाचा विचार होत असून, मुंबईचे सरचिटणीस अतुल भातखळकर यांनाही नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होते.