शिवसेना उमेदवार देणार नाही

By Admin | Updated: March 15, 2015 01:01 IST2015-03-15T01:01:35+5:302015-03-15T01:01:35+5:30

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

Shiv Sena will not give a candidate | शिवसेना उमेदवार देणार नाही

शिवसेना उमेदवार देणार नाही

तासगाव पोटनिवडणूक : स्वाभिमानीचाही पाठिंबा
मुंबई : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. तर खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने श्रीमती पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपाचा निर्णय सोमवारी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे तासगाव विधानसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात उमेदवारी न देता, सर्वांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तासगाव बिनविरोध होणार असेल, तर वांद्रे पूर्वमध्येसुद्धा इतरांनी उमेदवार देऊ नये, अशी भूमिका जाहीर केली होती. वांद्रेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढणार नसल्यामुळे तासगावमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय शिवसेनेने रविवारी घेतला. तशी माहिती प्रसिद्धी प्रमुख हर्षल प्रधान यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, खा. संजयकाका पाटील व अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळ येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सर्वांची मते जाणून घेतली.
या पोटनिवडणुकीबाबत सोमवारी पक्षश्रेष्ठींना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे
व रिपाइंसह काँग्रेसनेदेखील उमेदवार
न देण्याचा निर्णय घेतला
असल्यामुळे ही निवडणूक जवळपास बिनविरोध होण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)

आर.आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस उमेदवार देणार नाही. तसेच वांद्रे पूर्व येथून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. या संबंधीची चर्चाही झालेली नाही.
- खा. अशोक चव्हाण,
प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Shiv Sena will not give a candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.