‘शिवसेनेला किंमत मोजावी लागेल’

By Admin | Updated: September 30, 2016 02:55 IST2016-09-30T02:55:55+5:302016-09-30T02:55:55+5:30

मराठा समाजाच्या वतीने न्याय्य मागण्यांसाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने शांततामय व अहिंसात्मक मार्गाने मूक मोर्चे निघत असताना शिवसेनेच्या मुखपत्रातून मराठा

'Shiv Sena will have to pay' | ‘शिवसेनेला किंमत मोजावी लागेल’

‘शिवसेनेला किंमत मोजावी लागेल’

मुंबई : मराठा समाजाच्या वतीने न्याय्य मागण्यांसाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने शांततामय व अहिंसात्मक मार्गाने मूक मोर्चे निघत असताना शिवसेनेच्या मुखपत्रातून मराठा समाजातील माता-भगिनींचा अपमान करणारे व्यंगचित्र छापून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पवार म्हणाले, आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांनी मराठा समाजाची माफी मागायला हवी होती. परंतु तितकेही सौजन्य त्यांना दाखवता आले नाही. कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या लिखाणाला व मजकुराला कायद्यानुसार संबंधित वृत्तपत्राचा संपादक जबाबदार असतो, इथे व्यंगचित्रकारालाच बळीचा बकरा बनविला जात आहे. खरं तर सामनाच्या संपादकांनी माफी मागायला हवी, असेही पवार म्हणाले. मराठा समाजाने यापूर्वीच आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवलेल्या आहेत. शिवाय सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेदेखील मागण्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे आता आणखी कसली चर्चा करायची आहे, असा सवालही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 'Shiv Sena will have to pay'