मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. या निकालाबाबत अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात असताना माजी एटीएस अधिकारी महबूब मुजावर यांनी मोठा दावा केला. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश मिळाले होते, असे त्यांनी म्हटले. याबाबत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सांवत यांना प्रश्न विचारताच त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली.
एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचा पत्रकार हा अरविंद सांवत यांना माजी अधिकारी महबूब मुजावर यांनी मोहन भागवत यांच्याबद्दल केलेल्या दाव्याबद्दल विचारणा करतात. सुरुवातीला अरविंद सावंत त्याबाबत बोलणे टाळतात. पण त्यानंतर लगेच त्यांनी भडास काढली. इतक्या दिवस त्यांचे तोंड कोणी शिवले होते का? आज तुम्ही लगेच भाजपचे झालात का? कोणाचेही होऊ नका. न भाजपचा, न काँग्रेसचा, खरे बोला! असे लोक *** असतात, अशा शब्दांत अरविंद सांवतांनी आपली प्रतिक्रिया दिली.
महबूब मुजावर काय म्हणाले?एका वृत्तवाहिनीशी बोलताना महबूब मुजावर म्हणाले की, मालेगाव बॉम्ब स्फोटानंतर तत्कालीन तपास अधिकारी परमवीर सिंह आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले. भगवा दहशतवाद स्थापित करण्याच्या उद्देशाने हा आदेश देण्यात आला. मी आदेशांचे पालन न केल्यामुळे, माझ्यावर खोटा खटला दाखल करण्यात आला आणि त्यामुळे माझे ४० वर्षांचे करिअर उद्ध्वस्त झाले. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पण या सर्व प्रकरणांमध्ये माझी निर्दोष मुक्तता करण्यात आली. भगवा असो वा हिरवा, दहशतवाद समाजासाठी चांगला नाही. मालेगाव स्फोट प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयावर मी समाधानी आहे."