औरंगाबादेत अखेर शिवसेनाच वरचढ
By Admin | Updated: April 7, 2015 04:18 IST2015-04-07T04:18:00+5:302015-04-07T04:18:00+5:30
शिवसेना-भारतीय जनता पार्टीची नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस मुदतीपूर्वी युती झाली

औरंगाबादेत अखेर शिवसेनाच वरचढ
औरंगाबाद : शिवसेना-भारतीय जनता पार्टीची नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस मुदतीपूर्वी युती झाली. राज्यात जरी भाजपा मोठ्या भावाच्या रूपात वावरत असला तरी स्थानिक पातळीवर मात्र सेनेने मोठेपण हिसकावून घेतले आहे. मर्जी नसतानाही भाजपाने अनेक जागांवर पाणी सोडून सेनेचे मोठेपण मान्य केले. वरिष्ठ नेत्यांचा दट्टा आणि संघाने भाजपाऐवजी सेनेवर दाखविलेला विश्वास युती होण्यासाठी फलदायी ठरला असला तरी बंडखोरी मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत. युतीची घोषणा करताना भाजपा नेत्यांच्या चेहऱ्यांवर प्रचंड तणाव तर जास्तीच्या जागा मिळविल्याचा आनंद सेना नेत्यांच्या चेहऱ्यावर होता.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत १११ वॉर्डांपैकी ६८ शिवसेना, तर ४३ जागांवर भाजपा लढणार आहे, तर औरंगाबादेत ११३ पैकी ६४ वॉर्डांत सेना, तर ४९ वॉर्डांत भाजपा लढणार आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवी मुंबईत भाजपाचा १ नगरसेवक असताना ४३ जागा मिळाल्यामुळे औरंगाबाद मनपा वाटाघाटीत भाजपाला कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागली आहे.
युतीसाठी सोमवारी झालेली ११ वी बैठक होती. ६ एप्रिल भाजपा स्थापना दिन असल्यामुळे युतीची बोलणी यशस्वी झाल्याचे सांगून खा. दानवे म्हणाले, वॉर्ड वाटपाचा मुद्दा संपला आहे. दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत सेना-भाजपासोबत प्रचार करणार आहे. (प्रतिनिधी)