Thackeray Group MLA Bhaskar Jadhav News: मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले लोकही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत. अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता भास्कर जाधव यांचा क्रमांक लागणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यातच भास्कर जाधव यांनी मोठा निर्धार व्यक्त केला आहे.
पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. हे सिद्ध करण्याकरता आम्ही लढत राहू आणि सिद्ध करून दाखवू. पक्ष सोडण्याचा किंवा नाराज असण्याचा काही प्रश्न नाही. विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग यांनी खऱ्या वारसदाराला बाजूला सारून शिवसेनाप्रमुखांची शिवसेना, निशाणी, झेंडा हा तोतया वारसदारांचा असल्याचे ठरवले, हे दुर्दैवी असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
४३ वर्षांच्या राजकीय जीवनात क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही
गेल्या चार दिवसांत मी जे वक्तव्य केले नाही किंवा जी गोष्ट माझ्या मनामध्ये सुद्धा नाही. त्याला प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठी प्रसिद्धी दिली. त्यामुळे माझ्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे. मला माझ्या ४३ वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, हे माझे दुर्दैव आहे. अशी संधी केवळ मलाच मिळाली नाही, असे नाही, तर ती अनेकांना मिळत नसते, असे मी म्हणालो. परंतु, मला शिवसेना पक्षाने संधी दिली नाही, असे मी बोलल्याचे सातत्याने दाखवले गेले, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आपण सर्वांनी लढूया आणि जिंकूया, असा माझा पक्षातील पदाधिकऱ्यांकडे आग्रह आहे. त्यासाठी वेळ पडल्यास पक्षाने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेता पद मिळण्याकरिता नाराजीचे नाटक करत आहे, असे माध्यमांवर दाखवणे हे तर माझ्या राजकीय सिद्धांतावर अन्याय करणारे आहे, असे भास्कर जाधव यांनी नमूद केले. मी दिलेली वेळ आणि शब्द पाळतो. आता माझ्या उत्तरार्धाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये मी माझ्या तत्त्वांना मूठ माती द्यावी, असे अजिबात वाटत नाही. उलट मूळ शिवसेनेवर झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही न्याय मागत आहोत. पण तिथेही तारीख पे तारीख आम्हाला मिळत आहे. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सिद्ध करण्याकरिता लढत राहू आणि सिद्ध करून दाखवू, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.