...म्हणून तुम्हाला तुमचं मन खातंय; सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 04:09 PM2023-01-25T16:09:53+5:302023-01-25T16:10:14+5:30

राज्य सरकारला जर कुणाला आत टाकायचं असेल तर फार काही अवघड नव्हते. शिवसेना तुम्हाला आत टाकू शकली असती असं अंधारे म्हणाल्या.

Shiv sena Sushma Andhare Target BJP and DCM Devendra Fadnavis | ...म्हणून तुम्हाला तुमचं मन खातंय; सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

...म्हणून तुम्हाला तुमचं मन खातंय; सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Next

पुणे - मी बदला घेतला हे देवेंद्र फडणवीसांनीच म्हटलं. सूडाचं राजकारण करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा USP आहे. शिवसेना सूडाचं राजकारण करत नाही. तुम्ही कोणता गुन्हा केलाय जो तुम्हाला सतावतोय, कुणाला अडकवलंय, काय नेमकं केलेय ज्यामुळे तुमचं मन तुम्हाला खातंय. त्यामुळे तुम्हाला आत टाकण्याची भीती आहे हे आम्हाला कळू द्या. आमच्याकडे किरीट सोमय्यांसारखी दिव्यदृष्टी नाही अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, सोमय्या यांनी केलेले आरोप आता ही प्रकरणे थंड पडली. तुम्हाला हवं तेव्हा एखाद्या मंत्र्याला अडचणीत आणू शकता. गरज पडली तर त्याला तुमच्यासोबत घेऊ शकता. इतके रंग कसे काय बदलू शकता त्याबद्दल तुमच्या गुणवत्तेचे कौतुक आहे. देवेंद्र फडणवीसांना आत टाकण्याचा डाव होता असं म्हणतात. तुम्ही असं कोणतं पाप केलंय का? तुम्हाला भीती काय वाटतेय? मुख्यमंत्रिपदाला किती अधिकार असतात हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. राज्य सरकारला जर कुणाला आत टाकायचं असेल तर फार काही अवघड नव्हते. शिवसेना तुम्हाला आत टाकू शकली असती. पण ही कपटी कारस्थाने करण्याची शिवसेनेला गरज पडली नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत आत टाकण्याचे डाव कुणाचे होते? या सगळ्या प्रकरणात सत्ता असताना केंद्रीय यंत्रणा हाती असताना अनिल देशमुखांना आत टाकण्याचा डाव कुणी आखला? सीबीआयला न्यायालयाने फटकारलं. संजय राऊत यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली ती कुणी केली? त्यातही न्यायालयाने राऊत यांच्यावरून ईडीला फटकारलं. प्रताप सरनाईकांना चौकशीचा ससेमिरा लावून हैराण करणारं कोण होतं? जर ते आरोप खरे होते मग तपास का थांबले? असा प्रश्न करत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार केला. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांना आत टाकण्यासाठी किती कुंभाड रचलं. वेगवेगळ्या प्रकरणात त्यांचे नाव खेचण्याचा प्रयत्न केला. यावर देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे काय आहे? आत टाकायची भाषा करता तेव्हा तुम्ही जी जी माणसं तुम्हाला घ्यायची होती त्यांच्यामागे ससेमिरा लावला. मानसिक तणावाखाली असताना अनेकांवर धाडी टाकल्या. या देशात न्यायालय सर्वोच्च मानायचं की किरीट सोमय्या यंत्रणा सर्वोच्च मानायची? सोमय्यांना एवढे बळ कुठून येते असंही त्यांनी विचारलं. 

शेलारांवरही निशाणा
उद्धव ठाकरे अपयशी नेते म्हणतात मग अमित शाह वारंवार मातोश्रीवर उंबरठे का झिजवत होते. भाजपासोबत युती असताना आमचे आमदार ५३ आणि युती तोडून स्वबळावर लढलो तेव्हा आमदार ६३ होते. तुमच्यासोबत आल्यावर आमचे १० आमदार कमी झाले. म्हणजे शिवसेनेसाठी भाजपा अपयशी आहेत. भाजपाचे नेते आणि मिंदे गटाचे लोक अभ्यास न करता फार व्यक्त होतात. त्यांनी अभ्यास करायला हवा असा टोला सुषमा अंधारे यांनी आशिष शेलारांना लगावला आहे. 
 

Web Title: Shiv sena Sushma Andhare Target BJP and DCM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.