ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - जागा वाटपावरुन महायुतीतील तणाव कायम असून शिवसेनेने अंतिम प्रस्तावाचा पुनर्विचार करावा अशी विनंती भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. आता शहा यांच्या विनंतीला मान देऊन उद्धव ठाकरे भाजपला जागा वाढवून देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रविवारी शिवसेनेने भाजपला ११९ जागा देण्याची तयारी दर्शवली. युती टिकवण्यासाठी हा अंतिम प्रस्ताव असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. तर भाजपाने या प्रस्तावावर असमाधान व्यक्त करत भाजप जास्त जागांच्या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे युती फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. सोमवारी सकाळी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. युती टिकवणे गरजेचे असल्याची भावना अमित शहांनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली. तसेच शिवसेनेने अंतिम प्रस्तावाचा पुनर्विचार करावा असे शहा यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना काय सांगितले हे अद्याप समजू शकलेले नाही.
--------
उद्धव ठाकरेंनी केले मोदींचे कौतुक
एकीकडे युतीमध्ये जागावाटपावरुन कमालीचा तणाव निर्माण झाला असतानाच उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून नरेंद्र मोदींचे भरभरुन कौतुक केले आहे. मुसलमानांना राष्ट्रभक्त असे संबोधित करणा-या मोदींचे अभिनंदन करायलाच पाहिजे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.